हरारे : हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रंगणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरले. उभय संघांतील पाच लढतींची मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने या सामन्यात दोन्ही संघांत कडवी चुरस पाहायला मिळू शकते.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या लढतीत धक्कादायक पराभव पत्करला. मात्र त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताने झिम्बाब्वेला १०० धावांनी सहज धूळ चारली. त्यामुळे आता मालिकेत आघाडी घेण्याची भारताला उत्तम संधी आहे. त्यातच यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य भारतीय संघात दाखल झाल्याने अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना संघ व्यवस्थापनापुढील डोकेदुखी वाढणार आहे. अभिषेक शर्माने गेल्याच लढतीत शतक झळकावल्याने यशस्वीला संघात कोणत्या क्रमांकावर संधी मिळणार, हे पहावे लागेल. गोलंदाजीत मुकेश कुमार, आवेश खान व फिरकीपटू रवी बिश्नोईवर भारतीय संघ अवलंबून आहे.
दुसरीकडे सिकंदर रझाच्या झिम्बाब्वे संघात असंख्य गुणवान खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र फलंदाजांनी अद्याप निराशा केलेली आहे. या लढतीत पावसाची शक्यता नसून खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल.
प्रतिस्पर्धी संघ
> भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, संजू सॅमसन.
> झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), अक्रम फरझ, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंदई, जोंगवे लूक, काया इनोसंट, मॅडीन क्लाइव्ह, मधवीरे वेस्ले, मरुमनी तदिवांशे, मसाकाद्झा, मावुटा ब्रँडन, मुझरबानी ब्लेसिंग, मेयर्स डिओन, अंतूम नक्वी, नगरावा रिचर्ड, शुंबा मिल्टन.
> वेळ : दुपारी ४.३० वाजल्यापासून
> थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप