पॅरिस : आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांना तिरंदाजीत पदक जिंकण्याची संधी आहे. रविवारी होणाऱ्या या स्पर्धेत पदक जिंकून ऑलिम्पिकमधील ३६ वर्षांचा दुष्काळ संपविण्याची संधी भारतीय तिरंदाजांकडे आहे.
पात्रता फेरीत धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भगत यांनी शानदार कामगिरी केली. १२ वर्षांनंतर प्रथमच भारताची सहा जणांची तुकडी पाचही प्रकारांत पदकांच्या स्पर्धेत आहे. तिरंदाजीतील मिश्र सांघिक, पुरुष, महिला संघ आणि वैयक्तिक या पाचही गटांत भारताला पदकाची अपेक्षा आहे. १९८८ मध्ये तिरंदाजीत प्रथमच पदक जिंकल्यानंतर भारताला ३६ वर्षांपासून पदकाची प्रतिक्षा आहे. रविवारी महिला सांघिक उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यातील विजेत्याशी होईल. फ्रान्सला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असला तरी भारतीय संघ फॉर्मात आहे. अंकिता भगत, भजन कौर आणि दिपीका कुमारी या भारतीय त्रिकुटावर चाहत्यांच्या नजरा आहेत. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध ते कसा दबाव हाताळतात, यावर भारताचे यश अवलंबून असेल.
भारतीय महिला संघ फ्रान्सच्या तुलनेत मजबूत दिसत आहे. फ्रान्सच्या लिसा बर्बेलिन, अमेलिया कोर्डेयू आणि कॅरोलिने यांनी सराव सामन्यात भारताला ३-२ ने मात दिली आहे. २०२१ मध्ये विश्वचषक स्टेज-३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने फ्रान्सला धूळ चारत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अंकिता आणि दीपिका या दोघी सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होत्या. कोमालिका बारीची जागा भगतने घेतली आहे. भारताची अनुभवी तिरंदाज दीपिकाच्या खेळावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल. यंदा शांघाय येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते. आई झाल्यानंतर १८ महिन्यांनी तिने शानदार पुनरागमन केले होते. त्यामुळे पुन्हा तिच्या धडाकेबाज कामगिरीची भारताला अपेक्षा आहे. भारताचे हे त्रिकूट लयीत असून सांघिक कामगिरी करण्यात यश आले तर पदाक जिंकण्यापासून त्यांना रोखणे अशक्य आहे.