पोपची शतकी तोफ; दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा बळींसाठी संघर्ष

इंग्लंडने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा सकारात्मक सुरुवात केली. झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी ९ षटकांत ४५ धावा केल्या.
पोपची शतकी तोफ; दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा बळींसाठी संघर्ष

हैदराबाद : प्रतिभावान २६ वर्षीय फलंदाज ओली पोपने (२०८ चेंडूंत नाबाद १४८ धावा) भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करताना कारकीर्दीतील पाचवे शतक साकारले. त्यामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात झोकात पुनरागमन केले आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला.

राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यातील तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ७७ षटकांत ६ बाद ३१६ धावा केल्या आहेत. इंग्लंडची एकूण आघाडी १२६ धावांपर्यंत वाढली असून या खेळपट्टीवर चौथ्या डावात १५० ते २०० धावांचा पाठलाग करणे भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे रविवारी चौथ्या दिवशी भारताचे गोलंदाज किती लवकर इंग्लंडचे उर्वरित चार बळी मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. तिसऱ्या दिवसअखेर पोपच्या साथीला रेहान अहमद १६ धावांवर खेळत असून या दोघांनी सातव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली आहे.

तत्पूर्वी, शुक्रवारच्या ७ बाद ४२१ धावांवरून पुढे खेळताना भारताचा पहिला डाव १२१ षटकांत ४३६ धावांवर आटोपला. भारताला १९० धावांची आघाडी घेण्यात यश आले. ७ चौकार व २ षटकार लगावणाऱ्या जडेजाला चौथ्या कसोटी शतकाने हुलकावणी दिली. जो रूटने लागोपाठच्या चेंडूवर जडेजा व जसप्रीत बुमराला (०) बाद केले. अक्षर-जडेजाने आठव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. अक्षरने ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावा केल्या. मात्र त्याचेही अर्धशतक हुकले. इंग्लंडसाठी ऑफस्पिनर रूटने सर्वाधिक ४ बळी मिळवले. त्याला रेहान व टॉम हार्टली यांनी प्रत्येकी दोन गडी टिपून उत्तम साथ दिली.

इंग्लंडने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा सकारात्मक सुरुवात केली. झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी ९ षटकांत ४५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने क्रॉलीचा (३१) अडथळा दूर केला. त्यानंतर पोप व डकेट यांनी झटपट धावा करताना दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भर घातली. यावेळी बुमरा भारतासाठी धावून आला. त्याने दोन षटकांच्या अंतरात डकेट (४७) व रूट (२) यांचे बळी मिळवले. जडेजाने जॉनी बेअरस्टोचा (१०), तर अश्विनने बेन स्टोक्सचा (६) त्रिफळा उडवून इंग्लंडची ५ बाद १६३ अशी अवस्था केली. त्यावेळी सामना तिसऱ्या दिवशीच संपेल, असे वाटले.

मात्र पोप व बेन फोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ११२ धावांची अमूल्य भागीदारी रचून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. अक्षरने फोक्सला ३४ धावांवर त्रिफळाचीत केले. पोपने मात्र १७ चौकारांसह एक बाजू धरून शतक झळकावले आहे. त्याला भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचीही साथ लाभली. भारतासाठी दुसऱ्या डावात अश्विन व बुमराने प्रत्येकी दोन, तर अक्षर व जडेजाने एकेक बळी मिळवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in