रिंगआधीच राडा! 'इंडिया तेरा बाप है, माझ्या देशाचं नाव घेऊ नकोस'; दुबईत प्रतिस्पर्ध्यावर भडकला भारतीय बॉक्सर नीरज गोयत - Video

'माझ्या देशाबद्दल बोलू नकोस' असा इशारा नीरज गोयत वारंवार अँथनीला देत होता. पण, तरीही एंथनीने भारताबद्दल बोलणे सुरूच ठेवल्यामुळे चिडलेला नीरज 'माझ्या देशाबद्दल काही एक बोलू नकोस' असे म्हणत थेट एंथनीच्या अंगावर गेला अन्...
रिंगआधीच राडा! 'इंडिया तेरा बाप है, माझ्या देशाचं नाव घेऊ नकोस'; दुबईत प्रतिस्पर्ध्यावर भडकला भारतीय बॉक्सर नीरज गोयत - Video
Published on

दुबईमध्ये भारतीय बॉक्सर नीरज गोयत आणि त्याचा प्रतिस्पर्धी अँथनी टेलर यांच्यातील सामना होण्याआधीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मीडिया संवादादरम्यान दोघांमध्ये अचानक शाब्दिक चकमक झाली असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ही घटना तेव्हा घडली, जेव्हा दोन्ही बॉक्सर माध्यमांना स्वतंत्रपणे मुलाखती देत ​​होते. यावेळी अँथनीने भारताबद्दल केलेल्या एका अस्पष्ट टिप्पणीमुळे नीरज गोयत संतप्त झाल्याचं दिसून आलं. 'माझ्या देशाबद्दल बोलू नकोस' असा इशारा तो अँथनीला वारंवार देत होता. पण, तरीही अँथनीने भारताबद्दल बोलणे सुरूच ठेवल्यामुळे चिडलेला नीरज 'माझ्या देशाबद्दल काही एक बोलू नकोस' असे म्हणत थेट एंथनीच्या अंगावर गेला अन् काही क्षणातच हा वाद शिवीगाळपर्यंत पोहोचला. अखेरीस, 'इंडिया तेरा बाप है' असे नीरजने अँथनीला सुनावले. तणाव वाढताच आयोजक आणि उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं. प्रसंग हाताबाहेर जाण्याआधीच परिस्थिती नियंत्रणात आली आणि नीरज गोयत मुलाखतीसाठी पुढे निघून गेला.

यानंतर नीरज गोयतने "अँथनी, मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याचे परिणाम गंभीर आणि कायमस्वरूपी असू शकतात” असा मजकूर लिहून घटनेचा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. आता २० डिसेंबर रोजी हे दोघे खेळाडू रिंगमध्ये एकमेकांसमोर असतील.

बघा व्हिडिओ

या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांनी गोयतने स्वतःचा सन्मान जपल्याचे म्हणत त्याची पाठराखण केली आहे, तर काहींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी संयम राखावा, अशी भूमिका घेतली आहे. नीरज गोयत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणारा बॉक्सर म्हणून ओळखला जातो. दुबईतील ही घटना त्याच्या कारकिर्दीतील दुर्मीळ ‘ऑफ-रिंग’ वाद आहे. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या या बहुचर्चित लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून, रिंगमध्येही बाहेरील तणावाइतकी आक्रमकता दिसणार का, याबाबत उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in