रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना रंगला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने सलग तीन कसोटी सामन्यांवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. फिरकी गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करून भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिलने दुसऱ्या डावात केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला इंग्लंडला पराभूत करणं शक्य झालं. विशेष म्हणजे युवा फलंदाज ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांची अप्रतिम खेळी केली. या विजयामुळे टीम इंडियाने भारतीय खेळपट्टीवर सलग १७ वा मालिका विजय मिळवला. म्हणजेच २०१३ पासून भारतीय खेळपट्ट्यांवर टीम इंडियाने विजयाची मोहोर उमटवलीय.
दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरुवात करून भारताला ८४ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. परंतु, रोहित (५५), यशस्वी जैस्वाल (३७) धावांवर बाद झाल्यानंतर रजत पाटिदार (०), रविंद्र जडेजा (४) आणि सर्फराज खान (०) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या सावध खेळीमुळं भारताला या सामन्यात विजय संपादन करता आलं. शुबमनने १२४ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर ध्रुव जुरेल ७७ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने ७३ तर ध्रुव जुरेलने ९० धावांची खेळी साकारली होती. या धावांच्या जोरावर पहिल्या डावात भारताला सर्वबाद ३०७ धावांवर मजल मारता आली. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात दमछाक केली. इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी १४५ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे इंग्लंडने भारताला विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं होतं.