भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून मार्क्वेझ पायउतार; AIFF शी चर्चेनंतर दिला राजीनामा; निराशाजनक कामगिरी कारणीभूत

भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यापासून फार दूर आहे. तसेच सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर भारताची अवस्था आणखी बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाला विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही चांगली कामगिरी करता आलेली नाही.
भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून मार्क्वेझ पायउतार; AIFF शी चर्चेनंतर दिला राजीनामा; निराशाजनक कामगिरी कारणीभूत
छाया सौजन्य : एक्स (@MarcusMergulhao)
Published on

नवी दिल्ली : स्पेनचे ५६ वर्षीय मानोलो मार्क्वेझ यांनी भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फुटबॉल संघाची गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली सुमार कामगिरी यामागे कारणीभूत असल्याचे समजते. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाशी (एआयएफएफ) केलेल्या चर्चेनंतर आपली सहमतीने मार्क्वेझ यांनी राजीनामा दिला आहे.

भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यापासून फार दूर आहे. तसेच सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर भारताची अवस्था आणखी बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाला विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच आशियाई स्पर्धांमध्येही भारतीय संघ पिछाडीवर पडत आहे. अशा स्थितीत कराराचे एक वर्ष बाकी असतानाच मार्क्वेझ यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

“एआयएफएफ आणि मानोलो यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाच्या भवितव्याविषयी संवाद साधला. त्यातून निष्पन्न झालेल्या निष्कर्षानुसार मानोलो यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांत या रिक्त जागेसाठी नव्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील,” असे एआयएफएफचे सचिव के. सत्यनारायण म्हणाले.

जून २०२४मध्ये मानोलो यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. आधी ते इंडियन सुपर लीगमध्ये गोवा संघाला मार्गदर्शन करायचे. मानोलो यांना दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपदाचा करार देण्यात आला होता. मात्र १० जून रोजी एएफसी एशियन कप स्पर्धेत भारताला क्रमवारीत आपल्यापेक्षाही खाली असलेल्या हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. तसेच मानोलो यांच्या कार्यकाळात भारताला ८ पैकी फक्त १ सामना जिंकता आला. अनेक सामन्यांत तर भारताला एकही गोल झळकावता आला नाही. म्हणून छेत्रीलासुद्धा निवृत्ती मागे घेत पुन्हा खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तरीही भारताची सुमार कामगिरी सुरूच राहिली.

परिणामी मानोलो यांना एआयएफएफनेच पायउतार होण्यास भाग पाडले, असे समजते. कारण त्यांची हकालपट्टी करणे अधिक अपमानास्पद ठरले असते. भारतीय संघ शेवटचा फुटबॉल विश्वचषकासाठी कधी पात्र ठरला, हे आठवतही नाही. २०२२मध्ये भारतीय संघ किमान आशियाई देशांतील तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र आता २०२६च्या पात्रता फेरीपासून भारतीय संघ फार दूर आहे. आंतरखंडीय चषक, एशियन कप यांसारख्या स्पर्धांमध्ये भारताला क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या संघांकडून पराभव पत्करावा लागला. परिणामी भारतीय फुटबॉल संघाची क्रमवारीतही घसरण झाली. त्याशिवाय २०२८च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आशाही मावळल्या आहेत. अशा स्थितीत नव्या प्रशिक्षकाचा शोध घेऊन शून्यातून संघबांधणी करण्याचे आव्हान एआयएफएफपुढे आहे.

logo
marathi.freepressjournal.in