भारतीय फुटबॉलचा तारा 'सुनील छेत्री'चा अलविदा! ६ जून रोजी खेळणार शेवटची लढत

वयाच्या ३९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय फुटबॉलचा तारा 'सुनील 
छेत्री'चा अलविदा! ६ जून रोजी खेळणार शेवटची लढत

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि तारांकित आक्रमणपटू सुनील छेत्रीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. ३९ वर्षीय छेत्री ६ जून रोजी फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत कुवैतविरुद्ध कोलकाता येथे अखेरची लढत खेळणार आहे. गेल्या १९ वर्षांच्या कारकीर्दीत भारतीय फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या ताऱ्याला थाटात निरोप देण्यासाठी कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर नक्कीच चाहते आवर्जून गर्दी करतील, यात शंका नाही.

२००५मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या छेत्रीने गुरुवारी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. भारतीय संघ सध्या २०२६च्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत दुसऱ्या फेरीचे सामने खेळत आहे. अ-गटात समावेश असलेला भारतीय संघ सध्या ४ सामन्यांतील १ विजय, १ बरोबरी व २ पराभवांच्या ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ६ जून रोजी कोलकाता येथे भारतीय संघ कुवैतशी दोन हात करणार आहे. त्यानंतर ११ जूनला भारताची कतारशी गाठ पडेल. भारताने आघाडीच्या दोन संघांतील स्थान टिकवले, तरच ते पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत दाखल होतील. त्यामुळे छेत्रीसह तमाम चाहत्यांचे फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघही सर्वस्व पणाला लावेल.

छेत्रीने मार्च महिन्यात भारतासाठी १५०वा सामना खेळला. त्यानंतर आता १५१वी लढत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची ठरणार आहे. भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्री ९४ गोलसह अग्रस्थानी आहे. तसेच सध्या फुटबॉल खेळत असलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो व अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी या महान फुटबॉलपटूंनंतर तिसऱ्या स्थानी आहे. रोनाल्डोने १२८, तर मेस्सीने १०६ गोल केले आहेत.

छेत्रीच्या कर्णधारपदाखाली भारताने नेहरू चषक, आंतरखंडिय चषक, सॅफ स्पर्धा अनेकदा जिंकल्या. त्याशिवाय आयएसएल म्हणजेच इंडियन सुपर लीगमध्ये बंगळुरू एफसीकडून खेळतानाही जेतेपद काबिज केले. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्त झाला असला तरी तो विविध देशांतर्गत फुटबॉल लीगमध्ये खेळणार असल्याचे समजते.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारे खेळाडू

-ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) २०५ सामन्यांत १२८ गोल

-अली डे : निवृत्त (इराण) १४८ सामन्यांत १०८ गोल

-लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) १८० सामन्यांत १०६ गोल

-सुनील छेत्री (भारत) १५० सामन्यांत ९४ गोल

झळाळती कारकीर्द

- पदार्पण : २००५ वि. पाकिस्तान

- सामने : १५० g गोल : ९४

- कर्णधार म्हणून पहिला सामना : २०१२

- जेतेपद : एएफसी एशियन चषक, सॅफ, आंतरखंडिय चषक.

- खेलरत्न पुरस्कार जिंकणारा पहिला फुटबॉलपटू. तसेच अर्जुन व पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित.

- २००८च्या एएफसी चॅलेंज चषकात हॅट‌्ट्रिक व भारताला १९८४नंतर प्रथमच ती स्पर्धा जिंकवून देण्यात मोलाची भूमिका.

- तीन देशांमध्ये खेळणारा भारताचा पहिला फुटबॉलपटू.

- भारतासाठी सर्वाधिक सामने (१५०) तसेच हॅट्‌ट्रिकचा (४) विक्रम.

- वर्षातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटूचा ७ वेळा पुरस्कार.

- आय-लीग, आयएसएल, सॅफ या स्पर्धांमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू.

गेल्या महिन्याभरापासून मी याबाबत विचार करत होतो. मात्र १९ वर्षांच्या स्वप्नवत प्रवासानंतर थांबण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. भारतीय फुटबॉल संघ आता फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे मायदेशात कोलकाता येथे कुवैतविरुद्ध मी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे. तुम्हा सर्वांचा लाभलेला पाठिंबा कायम स्मरणात राहील.

- सुनील छेत्री

माझ्या भावा, मला तुझा अभिमान आहे.

- विराट कोहली, क्रिकेटपटू

सुनील तू भारताला लाभलेल्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहेस. भारतीय फुटबॉलसाठी तू दिलेले योगदान अमूल्य आहे. तुझी उणीव नक्कीच जाणवेल.

- बाइचुंग भुतिया, माजी फुटबॉलपटू

हा दिवस पाहू नये, अशी माझा इच्छा होती. मात्र कधी ना कधी, ही वेळ येणारच होती. ६ जून रोजी संपूर्ण देश तुझ्या कारकीर्दीचा नक्कीच आनंद साजरा करेल. धन्यवाद, माझा कर्णधार आणि मित्र.

- गुरप्रित सिंग संधू, भारताचा गोलरक्षक

logo
marathi.freepressjournal.in