बुडापेस्ट : हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात रविवारी भारताच्या पुरुष व महिला संघांनी बुद्धिबळात ऐतिहासिक यश संपादन केले. आपल्या संघांनी चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक काबिज करून बुद्धिबळ या अस्सल भारतीय खेळाच्या जन्मदात्या भूमीला जणू धन्य केले. त्यामुळे ६४ घरांच्या या खेळात भारतच राजा असल्याचे सिद्ध झाले. तसेच बुद्धिच्या जोरावर भारत कुठेही बाजीगर ठरू शकतो, हे अधोरेखित झाले.
विदीत गुजराथी, डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी आणि पेंटाला हरिकृष्णा या पाच जणांचा भारतीय पुरुष संघात समावेश होता. भारतीय पुरुषांनी ११ फेऱ्यांत सर्वाधिक २१ गुण कमावले. दुसरीकडे द्रोणावल्ली हरिका, दिव्या देशमुख, आर. वैशाली, वंतिका अगरवाल आणि तानिया सचदेव यांचा समावेश असलेल्या महिला संघाने १९ गुण प्राप्त करून सुवर्णपदक जिंकले. भारताने प्रथमच ऑलिम्पियाडमध्ये सोनेरी यश मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केल्याने देशासह जगभरातून या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच भारतीय बुद्धिबळातील खरा नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वनाथन आनंदलाही असंख्य जण या विजयाचे श्रेय देत आहेत. अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराचाही यामध्ये समावेश आहे.
“संपूर्ण स्पर्धेत आम्ही जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ केला. एक दिवस अगोदरच आम्हाला जेतेपदाचे वेध लागले होते. अंतिम फेरीत फक्त एक बरोबरीही विजयासाठी पुरेशी ठरणार होती. मात्र आम्ही त्यावेळी अधिक जल्लोष करणे टाळले. आम्ही या जेतेपदासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आनंद सरांचे या यशात मोलाचे योगदान आहे,” असे गुकेश म्हणाला.
“गेल्या २० वर्षांपासून बुद्धिबळ खेळत असल्याने हे जेतेपद खास आहे. संघातील अन्य सहकारी युवा आहेत. त्यांच्यासाठीही हे यश संस्मरणीय आहे. गेल्या असंख्य वर्षांपासून भारत बुद्धिबळात प्रगती करत आहे. त्याचेच हे फलित आहे. ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळाचा समावेश झाल्यास तेथेही भारत नक्कीच उज्ज्वल यश मिळवेल,” असे द्रोणावल्ली हरिकाने सांगितले.
यापूर्वी फक्त चीन आणि रशिया या देशांनी पुरुष व महिला विभागात ऑलिम्पियाड सुवर्णपदक काबिज केले होते. मात्र आता या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. भारतीय पुरुषांनी यापूर्वी २०१४ व २०२२मध्ये कांस्यपदक, तर महिलांनी २०२२च्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. कोरोनाच्या काळात ऑनलाईन स्पर्धेतही भारताने रशियासह संयुक्तपणे सुवर्णपदक प्राप्त केले होते. मात्र यंदा दोन्ही संघांनी सुवर्ण यश संपादन करून बुडापेस्टमध्ये तिरंगा फडकाविला. त्यामुळे भविष्यातही भारताचे बुद्धिवंत या खेळात आपले वर्चस्व कायम राखतील, अशी आशा आहे.
महाराष्ट्राचेही योगदान
भारताच्या या यशात महाराष्ट्रातील खेळाडूंचेही मोलाचे योगदान होते. ऑलिम्पियाडला बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. त्यामध्ये पुरुष संघासाठी नाशिकचा विदित, तर महिलांसाठी नागपूरच्या दिव्याने चमकदार कामगिरी केली. त्याशिवाय महिला संघाचे कर्णधारपद भूषवणारे अभिजीत कुंटे हेसुद्धा महाराष्ट्राचेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूही बुद्धीच्या खेळात स्वत:चे स्थान निर्माण करत आहेत, हे यावरून सिद्ध होते.
ऑलिम्पियाड स्पर्धेत अखेरच्या फेरीसह जेतेपद पटकावल्याबद्दल भारताच्या संघांचे अभिनंदन. गुकेश व अर्जुन यांनी संपूर्ण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली. तसेच महिलांमध्ये दिव्या देशमुख व वंतिका अगरवालने छाप पाडली. अभिजीत कुंटे व श्रीनाथ या कर्णधारांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. भारतीय बुद्धिबळासाठी हा सुवर्ण काळ आहे.
- विश्वनाथन आनंद, भारताचा ग्रँडमास्टर
६४ घरांच्या खेळात भारतीय संघांनी ऐतिहासिक यश संपादन केले. आपल्या पुरुष व महिला संघाचे अभिनंदन. तुमच्या या यशामुळे असंख्य युवकांना बुद्धिबळाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.
- नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान
बुद्धिबळात भारताची ऐतिहासिक कामगिरी. भारताच्या पुरुष व महिला संघाचे हार्दिक अभिनंदन. पहिल्यांदाच ऑलिम्पियाड सुवर्ण पटकावून या संघांनी देशाची शान वाढवली आहे.
- मनसुख मंडविया, केंद्रीय क्रीडामंत्री
हे जेतेपद ऑलिम्पिक सुवर्णपदकाइतकेच खास!
मुंबई : भारताचे माजी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनीही या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच हे जेतेपद ऑलिम्पिक सुवर्णपदकाइतकेच खास असल्याचे सांगितले.
“कोरोना काळानंतर भारताची बुद्धिबळातील प्रगती झपाट्याने वाढत गेली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत जगभरातील संघ खेळतात. त्यामुळे जेतेपद पटकावणे अत्यंत अवघड असते. भारताला या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. मात्र, आता भारतीय संघ यशस्वी ठरला असून या जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज प्राप्त झाले आहे,” असे ठिपसे म्हणाले.
“भारतीय बुद्धिबळाची गेल्या काही वर्षांत झालेली प्रगती कौतुकास्पद आहे. अनुभवी खेळाडूंसह युवा पिढीचेसुद्धा यामध्ये तितकेच मोलाचे योगदान आहे, असेही ठिपसे म्हणाले.
“गुकेश, अर्जुन आणि प्रज्ञानंद हे पुढील काही वर्षे बुद्धिबळविश्वात आपला लौकिक राखतील. २०२६ आणि २०२८च्या जागतिक अजिंक्यपद लढतीत भारतीय बुद्धिबळपटू चमकदार कामगिरी करताना दिसू शकतील. मात्र, इतक्यावरच समाधान मानणे योग्य ठरणार नाही. बुद्धिबळविश्वात रशियाप्रमाणे दीर्घकाळ वर्चस्व गाजवायचे झाल्यास भारताने आणखी खेळाडू शोधणे, त्यांना तयार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक पातळीवर अधिकाधिक स्पर्धा खेळण्याची संधी देणे गरजेचे आहे,” असेही ठिपसे म्हणाले.