नवी दिल्ली : द ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. आर. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता २७ वर्षीय क्रिशन पाठक भारतीय हॉकी संघासाठी गोलरक्षकाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. सप्टेंबरमध्ये रंगणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी गुरुवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक मिळवले. यानंतर ३६ वर्षीय श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे श्रीजेशची जागा भरून काढणे कठीण असले तरी पुढे जाणे गरजेचे आहे. ८ ते १७ सप्टेंबरदरम्यान चीन येथे आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघात १८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत संघाचे नेतृत्व करणार असून ऑलिम्पिकमधील काही खेळाडूंना या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, क्रिशन हा ऑलिम्पिकमध्ये भारताचा राखीव गोलरक्षक होता. मात्र आता तो मुख्य गोलरक्षकाची भूमिका बजावेल. क्रिशन हा गेल्या ५-६ वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे. मात्र त्याला श्रीजेशच्या अनुपस्थितीतच संधी लाभायची. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला मलेशिया, कोरिया, जपान, पाकिस्तान, चीन यांसारख्या देशांशी दोन हात करायचे असल्याने क्रिशनचे कौशल्य पणाला लागेल. ८ तारखेला चीनविरुद्धच्या लढतीने भारतीय संघ अभियानाला प्रारंभ करणार आहे.
भारताचा संघ
हरमनप्रीत सिंग (कर्णधार), क्रिशन पाठक, सुरज करकेरा, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, राज कुमार पाल, निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, मोहम्मद मौसीन, अभिषेक, सुखजीत सिंग, अरायजीत सिंग, उत्तम सिंग, गुर्जोत सिंग.