आशियाई, विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी संघ जाहीर; भारतासमोर गटात कडवे आ‌व्हान

पुढील महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून, संघात कोणतीही अनपेक्षित निवड करण्यात आलेली नाही.
आशियाई, विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी संघ जाहीर; भारतासमोर गटात कडवे आ‌व्हान
आशियाई, विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी संघ जाहीर; भारतासमोर गटात कडवे आ‌व्हान (PHOTO -X)
Published on

नवी दिल्ली : पुढील महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून, संघात कोणतीही अनपेक्षित निवड करण्यात आलेली नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ज्या २० खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्याच २० जणांच्या गटावर विश्वचषकासाठी विश्वास दाखवण्यात आला आहे. रविवारी जाहीर झालेला हा संघ सलिमा टेटेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. मुख्य प्रशिक्षक शोर्ड मॅरिन यांनी हा संघ संतुलित असल्याचे म्हटले आहे. १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान विश्वचषक होईल.

सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय शिबिरात संघ सराव करत आहे. संघात अनुभवी खेळाडू आणि उदयोन्मुख युवा खेळाडूंचा योग्य मेळ आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या एफआयएच नेशन्स कपमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत अपराजित राहत भारताने विजेतेपद पटकावले होते, ज्यामुळे संघाचे एफआयएच प्रो लीगमध्ये पुनरागमन झाले. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात गोलरक्षक म्हणून सविता आणि बिचू देवी खरिबाम यांचा समावेश आहे. बचावफळीत इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंतलुंगी, ज्योती आणि शिल्पी डबास यांचा समावेश आहे.

भारतासमोर गटात कडवे आ‌व्हान

विश्वचषकात भारतीय संघ अ-गटात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. नेदरलँडमधील ॲमस्टेलवीन येथील वॅगेनर हॉकी स्टेडियमवर भारताचे सर्व साखळी सामने होतील. भारतीय संघ १६ ऑगस्टला चीनविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, त्यानंतर १८ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका आणि २० ऑगस्टला इंग्लंडशी सामना होईल. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत जपानमधील आइची-नागोया येथे होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in