लांबउडीपटू श्रीशंकर ऑलिम्पिकला मुकणार

२५ वर्षीय श्रीशंकरने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक कमावले होते. त्याने २०२३च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत ८.३७ मीटर अंतरावर झेप घेत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली होती.
लांबउडीपटू श्रीशंकर ऑलिम्पिकला मुकणार

नवी दिल्ली : भारताचा लांबउडीपटू मुरली श्रीशंकर गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिकला मुकणार आहे. त्यामुळे भारताच्या पदकांच्या आशेला काहीसा धक्का बसला आहे.

२५ वर्षीय श्रीशंकरने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक कमावले होते. त्याने २०२३च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत ८.३७ मीटर अंतरावर झेप घेत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली होती. मात्र सरावादरम्यान श्रीशंकरच्या पायाला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तो किमान २-३ महिने खेळू शकणार नाही. त्यामुळेच श्रीशंकरला ऑलिम्पिकला मुकावे लागेल. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.

“माझ्यासाठी ही फारच दु:खद गोष्ट आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आतूर होतो. मात्र माझे हे स्वप्न भंगले आहे. दुखापत झाल्याने मी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मात्र यातून सावरत मी दमदार पुनरागमन करेन,” असे श्रीशंकर म्हणाला. गतवर्षी जूनमध्ये श्रीशंकरने डायमंड लीग स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले होते. अशी कामगिरी करणारा तो तिसराच खेळाडू ठरला होता.

दीपा कर्माकर जिम्नॅस्टिक्स विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

दोहा येथे सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकरने महिलांच्या वॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. पात्रता फेरीत दीपाने सहावे स्थान मिळवले. मात्र भारताची अन्य स्पर्धक प्रणती नायकला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही पात्रता स्पर्धा सुरू असून ३० वर्षीय दीपाने पहिल्या प्रयत्नात १२.५००, तर दुसऱ्या प्रयत्नात १३.०६६ गुण कमाले. शुक्रवारी अंतिम फेरी रंगणार आहे. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये दीपाने जिम्नॅस्टिक्समध्ये वॉल्ट प्रकारात चौथे स्थान प्राप्त केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in