भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव; रौप्यपदकावर समाधान मानावे लागले
राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी भारतीय पुरुष हॉकी संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून ७-० ने पराभूत झाला. त्यामुळे सुवर्णपदकाची अपेक्षा असलेल्या भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल स्पर्धेत सातव्यांदा सुवर्णपदक जिंकले.
ऑस्ट्रेलियाकडून, नॅथन, जेकब अँडरसन आणि यांनी प्रत्येकी दोन गोल केले. टॉम विकहम, ब्लॅक गोव्हेर्स, फ्लिन ओगलव्ही यांनी प्रत्येकी एक गोल केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन, दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन गोल डागले. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी गोल डागला. भारताला ऑस्ट्रेलियाचे आक्रमण मोडून काढण्यात अपयश आले. भारतीय खेळाडूंना एकही गोल करता आला नाही.
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलपोस्टवर जोरदार आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दोन गोल डागले. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर दबाव आला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे भारताच्या बचाव फळीवर मोठा दबाव आला. गोलकिपर श्रीजेशने आपला अनुभव पणाला लावत जोरदार प्रतिकार केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी दोन गोल डागत सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली. दुसरे क्वार्टर संपताना ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल करीत दुसऱ्या क्वार्टरअखेर ५-० अशी मोठी आघाडी घेतली.
पहिल्या दोन क्वार्टरमध्येच ५-० असा पिछाडीवर पडून वैफल्यग्रस्त झालेल्या भारतीय खेळाडूंवर दबाव आणत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एक गोल करीत आघाडी ६-० अशी वाढविली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकच गोल केला; मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने एक गोल डागत आघाडी ७-० अशी केली. ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० असा पराभव करत सातव्यांदा सुवर्णपदक मिळविले.