भारतीय पुरुष संघाची कांस्यकमाई

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघालाही कांस्यपदकाने गौरवण्यात येते.
भारतीय पुरुष संघाची कांस्यकमाई

नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघाने बुधवारी आशियाई अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यांनी सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत कांस्यकमाई करण्याची किमया साधली, हे विशेष.

दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक प्रकारात अनुभवी शरथ कमल, जी. साथियान, हरमीत देसाई यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या भारतीय संघाने सोमवारी सिंगापूरला ३-० अशी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली होती. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघालाही कांस्यपदकाने गौरवण्यात येते. त्यामुळे भारतीय संघाचे पदक तेव्हाच पक्के झाले होते. मात्र ते सुवर्ण पदकासह मायदेशी परततील, अशी आशा चाहत्यांना होती. बुधवारी चायनीज तैपईविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारताला ०-३ असा सरळ तीन गेममध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. ४१ वर्षीय शरथ, साथियान या अनुभवी खेळाडूंनी एकेरीतील आपापल्या लढती गमावल्यानंतर हरमीतचाही संघर्ष कमी पडल्याने भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

चुआंग युनने शरथला ११-६, ११-६, ११-९ अशी धूळ चारली. त्यानंतर लिन यूनने साथियानवर ११-५, ११-६, १२-१० अशी मात केली. एकेरीतील तिसऱ्या लढतीत हरमीतने काओ चेंग जुईला संघर्ष करण्यास भाग पाडले. मात्र जुईने ११-६, ११-७, ७-११, ११-९ असा चार गेममध्ये विजय मिळवून भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in