मैदानात रंगणार IPL चा थरार, 'या' तारखेला सुरु होणार १७ वा हंगाम

लोकसभा निवडणुकांमुळे स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक विलंबाने जाहीर करणार; अरुण धुमाळ यांची माहिती
Indian Premier League
Indian Premier League

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच पुरुषांच्या आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा थरार २२ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र स्पर्धेचे अंतिम ‌वेळापत्रक लोकसभा निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यावरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ‘आयपीएल’चे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

२३ फेब्रुवारीपासून महिलांच्या आयपीएलचा (वुमेन्स प्रीमियर लीग) म्हणजेच डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम सुरू होईल. ही स्पर्धा १७ मार्चपर्यंत संपेल. मात्र एप्रिल ते मे महिन्याच्या कालाधवीत देशभरात लोकसभा निवडणूक रंगणार आहेत. त्यामुळे पुरुषांच्या आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह होते. तसेच ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र धुमाळ यांनी मंगळवारी ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होईल, हे स्पष्ट केले. तसेच स्पर्धा सुरू होण्याची तात्पुरती तारीखही त्यांनी सांगितली. मात्र अंतिम वेळापत्रक तसेच कोणते सामने नेमका कोणत्या शहरात होतील, हे स्पष्ट होण्यास काही कालावधी लागेल. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गतउपविजेता गुजरात टायटन्स यांच्यात सलामीचा सामना अपेक्षित आहे.

“यंदा २२ मार्च ते २६ मे दरम्यान आयपीएलचे आयोजन करण्यात येईल. मात्र पहिल्या १५ दिवसांचेच वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात येणार आहे. देशभरात लोकसभा निवडणूक होणार असल्याने त्याच्या तारखा स्पष्ट झाल्यावरच उर्वरित स्पर्धेचे वेळापत्रक आम्ही जाहीर करू. तसेच संपूर्ण आयपीएल भारतातच आयोजित केली जाईल,” असे धुमाळ म्हणाले. यापूर्वी २००९ व २०१४मध्ये निवडणुकांमुळे अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयपीएल खेळवण्यात आली होती. २०१९मध्ये मात्र निवडणुका असूनही संपूर्ण आयपीएल भारतात झाली होती.

१ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे २६ मेपर्यंत आयपीएल संपल्यावर भारताचे खेळाडू थेट विश्वचषकासाठी रवाना होतील. विश्वचषकात भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडशी पहिला सामना खेळणार आहे. ९ जूनला भारत-पाकिस्तान आमेनसामने येतील.

निवडणुकांनुसार आयपीएलचे ठिकाण

२००९ : दक्षिण आफ्रिका (पूर्ण हंगाम)

२०१४ : यूएई (पहिला टप्पा)

२०१९ : भारत (संपूर्ण हंगाम)

२०२४ : भारत (संपूर्ण हंगाम अपेक्षित)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in