कोइम्बतूर येथे रंगणार यंदाचा इंडियन रेसिंग फेस्टिव्हल; एफ-४ इंडियन चॅम्पियनशिपसह हंगामाला सुरुवात, नवी मुंबईतील नव्या सर्किटवर अंतिम सामना

रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या (आयआरएफ) एका नवीन आणि चुरशीच्या हंगामाची घोषणा करण्यात आली आहे.
कोइम्बतूर येथे रंगणार यंदाचा इंडियन रेसिंग फेस्टिव्हल; एफ-४ इंडियन चॅम्पियनशिपसह हंगामाला सुरुवात, नवी मुंबईतील नव्या सर्किटवर अंतिम सामना
कोइम्बतूर येथे रंगणार यंदाचा इंडियन रेसिंग फेस्टिव्हल; एफ-४ इंडियन चॅम्पियनशिपसह हंगामाला सुरुवात, नवी मुंबईतील नव्या सर्किटवर अंतिम सामना(Photo-X)
Published on

मुंबई : रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या (आयआरएफ) एका नवीन आणि चुरशीच्या हंगामाची घोषणा करण्यात आली आहे. या हंगामाचा प्रारंभ १२-१३ सप्टेंबर रोजी कोइम्बतूर येथील करी मोटर स्पीडवे येथे होणाऱ्या एफ४ इंडियन चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीने होणार आहे.

या मोसमात एफ४ चॅम्पियनशिपच्या सहा फेऱ्या आणि इंडियन रेसिंग लीगच्या चार फेऱ्या भारतातील प्रमुख रेसिंग ट्रॅकवर रंगतील. डिसेंबर महिन्यात नवी मुंबई स्ट्रीट सर्किट येथे होणाऱ्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक स्ट्रीट-रेसने या हंगामाचा शेवट होईल. एफआईए-प्रमाणित एफ४ इंडियन चॅम्पियनशिप कोइम्बतूरपासून सुरू होऊन नवी मुंबईतील अंतिम फेऱ्यांपर्यंत रंगणार आहे.

या स्पर्धेमुळे तरुण आणि उगवत्या रेसिंग ड्रायव्हर्सना मायदेशात स्पर्धा करण्याची, उत्तम रेसिंग अनुभव मिळवण्याची आणि सुपर लायसन्स पॉइंट्स जिंकण्याची मोठी संधी मिळणार आहे. २०२६च्या या स्पर्धेत ८ देशांचे ड्रायव्हर्स ८ वेगवेगळ्या संघातून उतरणार आहेत. इंडियन रेसिंग लीगचा थरार ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. २४-२५ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर लीगच्या चार फेऱ्यांपैकी पहिली फेरी खेळवली जाईल. या स्पर्धेत ६ शहरांचे संघ सहभागी होत आहेत.

दुसऱ्या बाजूला, एफ४ इंडियन चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि जगभरातील तरुण, गुणी ड्रायव्हर्स आपली प्रतिभा दाखवतील. यंदाच्या स्पर्धेत ८ देशांतील १४ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. यात एरॉन मेहता (सिंगापूर), स्वर्णव दास (भारत), साई आदित्य (अमेरिका/भारत), अनय दोषी (केनिया), भुवन बोनू (भारत), श्रवण षण्मुगावेल (युनायटेड किंगडम), क्रिशाय गुट्टे (भारत), आर्यन नरोला (अमेरिका/भारत), महलोरी मबुंडा (दक्षिण आफ्रिका), एन्झो रुजुगिरो (दक्षिण आफ्रिका), लुविवे संबुडला (दक्षिण आफ्रिका), न्तियिसो मबुंडा (दक्षिण आफ्रिका), मथियास अलेक्झांडर फॉरलँड (नॉर्वे) आणि एरिस किरियाकू (ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे.

हे ड्रायव्हर्स कोलकाता रॉयल टायगर्स, चेन्नई टर्बो रायडर्स, हैदराबाद ब्लॅकबर्ड्स, स्पीड डेमॉन्स दिल्ली, गोवा एसेस जेए रेसिंग, गॉडस्पीड कोची, अहमदाबाद एपेक्स रेसर्स आणि किच्चाझ किंग्स बेंगलोर या ८ संघांचे प्रतिनिधित्व करतील.

नवीन हंगामाबद्दल रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे (आरपीपीएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अखिलेश रेड्डी म्हणाले, “२०२६ चा हा मोसम ‘आरपीपीएल’साठी एक महत्त्वाचा टप्पा असून, मैदानात आणि मैदानाबाहेर भारतीय मोटरस्पोर्ट्सचा दर्जा उंचावणारा ठरेल असा विश्वास आम्हाला आहे.” एकूणच आता या फेस्टिव्हलची उत्सुकता आहे.

यंदाच्या हंगामाचे मुख्य वैशिष्ट्य

या हंगामाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई स्ट्रीट सर्किटचे आगमन, जिथे दोन्ही चॅम्पियनशिप्सच्या अंतिम फेऱ्या पार पडतील. पारंपरिक रेसिंग ट्रॅकच्या पलीकडे जाऊन देशातील मोठ्या शहरांमधील चाहत्यांपर्यंत हा खेळ थेट पोहोचवण्याच्या आरपीपीएलच्या संकल्पनेचा हा एक भाग आहे. तसेच इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स खेल आणि जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in