
हरियाणातील चरखी-दादरी येथील ६९व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळविले. हरियाणातील चरखी-दादरी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राला ३८-२१ असे नमविले.
उपांत्य सामन्यात हरियाणासारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच क्रीडांगणावर चितपट करणाऱ्या महाराष्ट्राला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. सावध सुरुवात करीत महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. त्यावेळी रेल्वेचे अवघे दोन गडी मैदानात शिल्लक होते. या दोघात गडी टिपताना प्रथम आकाशची व त्यानंतर अस्लमची पकड झाल्यामुळे रेल्वेने पुन्हा आघाडी घेतली. पूर्वार्धात दोन वेळा आकाश व दोन वेळा अस्लमची अव्वल पकड (सुपर कॅच) झाल्याने रेल्वेने मध्यांतरापर्यंत २०-१३ अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरानंतर मात्र आपल्या अनुभवाचा व रणनीतीचा कुशलतेने वापर करीत रेल्वेच्या पवनकुमारने महाराष्ट्राचे प्रथम तीन व नंतर दोन गडी टिपत महाराष्ट्रावर लोण देत आपली आघाडी २७-१३ अशी वाढविली. यानंतर मात्र रेल्वेने मागे वळून पाहिले नाही. रेल्वेच्या या विजयात पवनकुमार, विकास यांनी चढाईचा संयमी खेळ केला. त्यांना रविंदर पहेल यांनी उत्तम पकडी करीत छान साथ दिली. आकाश शिंदे, अस्लम इनामदार यांनी याच सामन्यात नाही, तर या संपूर्ण स्पर्धेत चतुरस्त्र चढाया करीत कबड्डी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
बचावात किरण मगर, शंकर गदई, अक्रम शेख, यांनी आपला ठसा उमटविला. यंदाचा महाराष्ट्राचा संघ हा अगदी नवोदितांचा होता. महाराष्ट्राने अंतिम सामन्यात देखील तडफेने खेळ केला. पण त्यांच्या या कामगिरीला सुवर्ण झळाळी न मिळता रुपेरी झळालीवर समाधान मनावे लागले असले तरी संघाचे मनोधैर्य मात्र निश्चितच वाढले असेल.
महाराष्ट्राच्या या रुपेरी कामगिरीत संघशिक्षक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रशांत चव्हाण, संघ व्यस्थापक आयुब पठाण, फिटनेस ट्रेनर पुरुषोत्तम प्रभू यांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करून खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलयाने महाराष्ट्राने ही मजल मारली. महाराष्ट्राच्या संघाने आतापर्यंत २४वेळा अंतिम फेरीत मजल मारली. १०वेळा विजेतेपद व हे धरून १४वेळा उपविजेतेपद मिळविले.