नवी दिल्ली : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आगामी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा नेमबाजी संघ शनिवारी पॅरिसला रवाना झाला. १० सदस्यीय या संघात पिस्तूल नेमबाज मनीष नरवाल याच्यासह अवनी लेखारा, मोना अगरवाल यांचा समावेश आहे.
भारताने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली होती.
भारताच्या नेमबाजी संघात आमीर अहमद भट, रुद्रांश खंडेलवाल, रुबिना फ्रान्सिस, स्वरूप उन्हाळकर, सिद्धार्थ बाबू, श्रीहर्ष देवर्दी आणि निहाल सिंग यांचा समावेश आहे. मात्र सर्वांच्या नजरा अवनी हिच्यावर लागलेल्या आहेत. अवनीने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला दोन पदके जिंकून दिली होती. जयपूरच्या १९ वर्षीय अवनीने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे तिच्याकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. पॅरालिम्पिक समितीला यंदा २५पेक्षा अधिक पदकांची अपेक्षा आहे.