पुजाराची गच्छंती; रहाणेला बढती! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

यशस्वी, मुकेश यांना संधी; ऋतुराज, सॅमसन यांचे पुनरागमन, शमीला विश्रांती
पुजाराची गच्छंती; रहाणेला बढती! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
Published on

अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेने मात्र संघातील स्थान टिकवले असून त्याच्याकडे पुन्हा उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी भारताचे कसोटी व एकदिवसीय संघ जाहीर केले. या दोन्ही मालिकांसाठी अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे.

१२ जुलैपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला प्रारंभ होणार असून उभय संघांत प्रथम २ कसोटी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर २७ जुलैपासून तीन एकदिवसीय लढतींची मालिका रंगेल. ३ ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होईल. टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समितीचे हंगामी अध्यक्ष शिवसुंदर दास यांनी सांगितले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय कसोटी संघाचे रूप आता पालटण्याची शक्यता आहे.

कसोटी संघातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईकर यशस्वी जैस्वालला प्रथमच मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी तो राखीव खेळाडूंमध्ये होता. तसेच महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि बंगालचा मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमार यांचाही पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पुजाराप्रमाणे उमेश यादवलासुद्धा कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कसोटीसह एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

पुजाराने गेल्या सहा कसोटींमध्ये अवघे एक अर्धशतक झळकावले आहे. त्याशिवाय डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीपूर्वी इंग्लंडमध्येच कौंटी क्रिकेट खेळूनही पुजाराला ऑस्ट्रेलियाविरुद्ध छाप पाडता आली नाही. दुसरीकडे रहाणेला स्थानिक हंगाम तसेच आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत दिलेल्या योगदानाचा लाभ झाला आहे. काही महिन्यांपूर्वी रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याशिवाय त्याचे कसोटी संघातील स्थानही डळमळीत झाले. मात्र आता तो पुन्हा उपकर्णधारपदी विराजमान झाला आहे.

एकदिवसीय संघात फारसे धक्कादायक बदल पाहायला मिळाले नाहीत. संजू सॅमसन आणि ऋतुराज यांचे पुनरागमन झाले आहे, तर मुकेशला एकदिवसीय संघातही स्थान लाभले आहे. श्रेयस अय्यर, के. एल. राहुल दुखापतग्रस्त असल्याने सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी देण्यात आली आहे.

भारताचा विंडीज दौरा

कसोटी मालिका : २ सामने (१२ जुलैपासून)

एकदिवसीय मालिका : ३ सामने (२९ जुलैपासून)

टी-२० मालिका : ५ सामने (३ ऑगस्टपासून)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचे संघ

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एस. भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी, मुकेश कुमार.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप चहल, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

logo
marathi.freepressjournal.in