हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास भारतीय संघ सज्ज

रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल अशा अनेक दिग्गज खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास भारतीय संघ सज्ज

नवनियुक्त प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह टी-२० मध्ये नव्या इनिंगसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. नवा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यासमोर संघाचे संयोजन करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

हार्दिक हा संघातील सर्वात अनुभवी फलंदाज असल्याने तो स्वत: वरच्या फळीत फलंदाजी करणार की संघात फिनिशरची भूमिका बजावणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणपणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हार्दिक आयपीएलमध्ये गुजरात जायंट्ससाठी अनेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता. त्यामुळे त्याच्या फलंदाजी क्रमाबाबत अनिश्चितता आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल अशा अनेक दिग्गज खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आल्याने सारी भिस्त हार्दिकवर आहे. नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लक्ष्मण यांच्यापुढेही मोठे आव्हान आहे.

रोहित आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत सलामीला कोण येणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. संघात शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे सलामीवीर आहेत. शुभमनसह इशान किशन डावाची सुरुवात करू शकतो, असे बोलले जात आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फिरकीपटूला संघात संधी मिळाली नव्हती. अक्षर पटेल आणि रविचंद्रन खेळाडू आता संघाचा भाग नाहीत. चायनामन स्पिनर कुलदीप यादवबरोबरच युझवेंद्रसिंग चहलचा संघात समावेश आहे. वॉशिंग्टन सुंदरचा अष्टपैलू म्हणून अंतिम ११ मध्ये समावेश झाल्यास कुलदीप किंवा चहलला संधी मिळू शकते.

न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप आणि भुवनेश्वर कुमार नवीन चेंडूवर खूप प्रभावी ठरू शकतात. अशा स्थितीत भारतासमोर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षल पटेल, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांचा पर्याय असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. उमराननेही आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक यशस्वी ठरला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडचा २-० आणि वेस्ट इंडिजचा १-० असा पराभव केला. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये पहिल्याच प्रयत्नात गुजरात जायंट्सला चॅम्पियन बनविले. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in