कोलंबो : गौतम गंभीरच्या प्रशिक्षण कारकीर्दीत पहिलीच एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवू शकते. भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी कोलंबोत रंगणार आहे. २७ वर्षांत भारताने श्रीलंकेत एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बरोबरीत रोखले. मग दुसऱ्या लढतीत भारताचा पराभव झाला. त्यामुळे १९९७ नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेचा संघ मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. भारताने ही लढत जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल. टी-२० मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते.
भारताने गेल्या ११ एकदिवसीय मालिकांमध्ये श्रीलंकेला धूळ चारली आहे. या मालिकेत रोहितची बॅट तळपत असली तरी विराट कोहली, के. एल. राहुल, शिवम दुबे यांनी निराशा केली आहे. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांचे त्रिकुट कमाल करत आहे. विराटने दोन सामन्यांत ३८ धावाच केल्या आहेत.
दुसरीकडे चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने चांगली कामगिरी केली आहे. जेफ्री वंडरसे, महीष थिक्षणा, वानिंदू हसरंगा या फिरकीपटूंनी सातत्याने योगदान दिले आहे. फलंदाजीत त्यांची कुशल परेरा, पथुम निसांका यांच्यावर भिस्त आहे. एकदिवसीय विश्वचषक तसेच टी-२० विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर सध्या हंगामी प्रशिक्षक सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेचा संघ सावरत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
> श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, असिता फर्नांडो.
> वेळ : दुपारी २.३० वा.
> थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी