शूटआऊटमध्ये भारतीय संघाचा विजय,कॅनडाला ३-२ने केले पराभूत

या विजयामुळे भारत आता ९ ते १२ वे स्थान मिळविण्यासाठी खेळण्यास पात्र ठरला.
 शूटआऊटमध्ये भारतीय संघाचा विजय,कॅनडाला ३-२ने केले पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला विश्वचषक हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कॅनडाला नमवून स्पर्धेत पहिलावहिला विजय मिळविला. भारतीय संघाने शूटआऊटमध्ये कॅनडाला ३-२ने पराभूत केले. या विजयामुळे भारत आता ९ ते १२ वे स्थान मिळविण्यासाठी खेळण्यास पात्र ठरला.

क्लासिफिकेशनच्या लढतीत कर्णधार आणि गोलकीपर सविताने शानदार कामगिरी केली. निर्धारित वेळेनंतर दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली होती. मेडेलाइन सेकोने अकराव्या मिनिटाला कॅनडाला आघाडी मिळवून दिली होती; परंतु भारताला ५८व्या मिनिटाला सलीमा टेटेने गोल डागून बरोबरी साधून दिली; मात्र गोलकीपर म्हणून सविताने चमकदार कामगिरी केली. सविताने शूटआऊटमध्ये प्रतिरस्पर्धी संघाचे सहा प्रयत्न हाणून पाडले. नवनीत कौर, सोनिका आणि नेहा यांनी गोल डागून भारताचा विजय पक्का केला. स्पेनविरुद्ध क्रॉसओव्हरच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारतीय हॉकीपटूंनी निराशा झटकून टाकली. भारताच्या सुरुवातीच्या दबावाला यशस्वी तोंड दिल्यानंतर एका क्षणी कॅनडाच्या खेळाडूंनी चेंडूला गोल जाळ्यात पोहोचविले होते; परंतु रेफरीने हा गोल अमान्य करत पेनल्टी कॉर्नर दिला; परंतु नताली सोरिस्यू गोल करण्यात अपयशी ठरली.

कॅनडाला या नंतर काही मिनिटांनी आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये धडाक्यात सुरुवात करून अनेक वेळा कॅनडाचा बचाव भेदून काढला; परंतु गोल करण्यात अपयश आले. मोनिकाने काही संधी निर्माण केल्या. नवनीत कौर, नेहा आणि वंदना कटारिया या त्रिकुटाने कॅनडाच्या बचाव फळीवर सातत्याने दबाव आणला. नवनीत आणि वंदना यांनी २५व्या मिनिटाला गोल डागण्याचा शानदार प्रयत्न केला; परंतु गोलकीपर रोव्हन हॅरिसने हा प्रयत्न निष्फळ ठरविला.

मध्यंतरानंतर भारताने आक्रमणावर भर कायम ठेवला. लालरेमसियामीने कॅनडाची बचाव फळी भेदण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निष्फळ ठरला. भारताला बरोबरी करण्याची नामी संधी मिळाली; परंतु सर्कलच्या आतून फटका मारण्याचा प्रयत्न करताना नवज्योत कौरने तटवलेला चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेला. सविताने यानंतर पेनल्टी कॉर्नरवर शानदार बचाव करीत कॅनडाला आघाडी घेण्यापासून रोखून धरले. भारत आता ९ ते १२ व्या स्थानासाठी प्लेऑफमध्ये जपानशी लढत देणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in