विजयी आघाडीचे भारतीय महिलांचे लक्ष्य; वेस्ट इंडिजविरुद्ध आज दुसरा टी-२० सामना, क्षेत्ररक्षणात सुधारणा अपेक्षित

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
विजयी आघाडीचे भारतीय महिलांचे लक्ष्य; वेस्ट इंडिजविरुद्ध आज दुसरा टी-२० सामना, क्षेत्ररक्षणात सुधारणा अपेक्षित
एक्स
Published on

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारत-विंडीज यांच्यातील दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण सुधारण्याकडे संघाचे लक्ष असेल.

यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतला ०-३ असा मार खावा लागला. मात्र त्यातून सावरत रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने विंडीजला ४९ धावांनी पराभूत केले. जेमिमा रॉड्रिग्ज व स्मृती मानधना या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तसेच गोलंदाजीत तिथास साधूने छाप पाडली. मात्र या लढतीत भारतीय खेळाडूंनी ३ झेल सोडले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्या चुका टाळण्यावर भारताला भर द्यावा लागेल.

स्मृतीच्या साथीने उमा छेत्रीला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. जेमिमाही लयीत आहे. मात्र हरमनप्रीतला कामगिरी उंचवावी लागेल. ती सातत्याने अपयशी ठरत आहे. दीप्ती शर्मा, रिचा घोष व सजीवन सजना हाणामारी करण्यात पटाईत आहेत. गोलंदाजीत साधू व रेणुका सिंग यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त आहे. दीप्ती व राधा यादव फिरकीची धुरा वाहतील.

अमोल मुझुमदार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय महिलांना पुढील वर्षी मायदेशातच होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करायची आहे. ३ टी-२० सामन्यानंतर भारतीय संघ ३ एकदिवसीय लढतीही खेळणार आहे. बडोदा येथे २२, २४ व २७ डिसेंबरला एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. पहिल्या दोन लढती दुपारी १.३० वाजता, तर तिसरा एकदिवसीय सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.

दुसरीकडे हीली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीज संघाला फलंदाजीत सुधारणा अपेक्षित आहे. डिएंड्रा डॉटिनने पहिल्या सामन्यात वेगवान अर्धशतक झळावून छाप पाडली. मात्र तिला अन्य फलंदाजांची साथ लाभणे गरजेचे आहे. विंडीजची टी-२० प्रकारातील कामगिरी गेल्या काही वर्षांत खालावलेली आहे. टी-२० विश्वचषकात त्यांना २०१६नंतर अंतिम फेरी गाठणेही जमलेले नाही.

वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ (इंग्रजी भाषेत), कलर्स सिनेप्लेक्स (हिंदी) वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in