भारतीय महिलांची श्रीलंकेवर मात,१० विकेट्स राखून पराभव

भारताकडून गोलंदाजीत २८ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेणाऱ्या रेणुका सिंहला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
भारतीय महिलांची श्रीलंकेवर मात,१० विकेट्स राखून पराभव

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 10 विकेट्स राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेवर २-० ने कब्जा केला. भारताकडून गोलंदाजीत २८ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेणाऱ्या रेणुका सिंहला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा डाव १७३ धावात गुंडाळल्यांनतर विजयाचे लक्ष्य भारतीय महिलांनी २५.४ षटकांत एकही विकेट न गमावता साध्य केले. भारताची सलामीवीर स्मृती मानधना (८३ चेंडूंत नाबाद ९४) आणि शेफाली वर्मा (७१ चेंडूंत नाबाद ७१) यांनी शानदार फलंदाजी केली. भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंहच्या चार विकेट्स बरोबरच मेघना सिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

भारताने पहिल्या षटकापासूनच श्रीलंकेच्या बॅटर्सना अडचणीत आणले. रेणुका सिंहने श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीर हसिमी परेरा (४ चेंडूंत ०) आणि विश्मी गुणरत्ने (१४ चेंडूंत ३) यांना त्रिफळाचीत केले. पाठोपाठ हर्षिता समरविक्रमेला (३ चेंडूंत ०) हिलादेखील पायचीत करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर श्रीलंकेचा डाव काहीसा सावरत असल्याचे वाटत असतानाच मेघना सिंहने कर्णधार चामारी अथापथ्थूला (४५ चेंडूंत २७) शफाली वर्मामार्फत झेलबाद केले. त्यानंतर अनुष्का संजिवनी (४४ चेंडूंत २५) आणि नीलाक्षी डी सिल्वा (६२ चेंडूंत ३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संजिवनी आणि कविशा दिलहारी (७ चेंडूंत ५) पाठोपाठ धावबाद झाल्यामुळे श्रीलंकेची अवस्था २४.२ षटकांत ६ बाद ८१ अशी झाली. अमा कांचना (८३ चेंडूंत नाबाद ४७) आणि निलाक्षी (६२ चेंडूंत ३२) यांनी श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. श्रलंकेच्या इतर बॅटर्सना फारशी चमक दाखविता आली नाही. श्रीलंकेचा डाव १७३ धावांवर संपुष्टात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in