

मोकी, चीन : महिला ज्युनिअर आशियाई चषक हॉकी स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने आपल्या मोहिमेची दणकेबाज सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण कोरियावर ४-१ अशी मात केली.
सानिका चंद्रकांत माने, पूर्णिमा यादव, पूजा साहू आणि मधू सिदार यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या या विजयात मोलाचे योगदान दिले. गेल्या दोन आवृत्यांचे विजेतेपद भूषवणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक चढायांवर भर दिला. सामन्याच्या आठव्या मिनिटाला सानिकाने मैदानी गोल नोंदवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताला यश आले नाही, तरीही ३० व्या मिनिटाला पूर्णिमा यादवने सुरेख गोल करत मध्यंतरापूर्वी भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली.
उत्तरार्धात दक्षिण कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला; मात्र भारताची बचाव फळी भक्कम राहिली.
तिसऱ्या सत्राच्या अखेरीस मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पूजा साहूने गोल डागून धावसंख्या ३-० केली. त्यानंतर ५१ व्या मिनिटाला मधू सिदारने चौथा गोल करत भारताला ४-० अशी मजबूत स्थिती प्राप्त करून दिली. कोरियाच्या के. आय. एल. गाबिनने ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर एक गोल नोंदवून पराभवातील अंतर कमी केले. भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी मलेशियाविरुद्ध होणार आहे.