
सलामीवीर शफाली वर्माने (२८ चेंडूंत ४२ धावा आणि १ बळी) दाखवलेली अष्टपैलू चमक आणि फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात थायलंडचा ७४ धावांनी धुव्वा उडवला. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत भारताची श्रीलंकेशी गाठ पडेल.
सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. शफालीने पाच चौकार व एक षटकार झळकावला. कर्णधार हरमनप्रीत कौर (३० चेंडूंत ३६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२६ चेंडूंत २७) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर दीप्ती शर्मा (३/७) आणि राजेश्वरी गायकवाड (२/१०) यांच्या फिरकीने कमाल केल्यामुळे थायलंडला २० षटकांत ९ बाद ७४ धावाच करता आल्या. शफालीनेसुद्धा एक बळी मिळवला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर अवघ्या एका धावेच्या फरकाने विजय मिळवला. श्रीलंकेने ६ बाद १२२ धावा केल्यानंतर पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, भारताने सहा वेळा आशिया चषक उंचावला असून, शनिवारी श्रीलंकेला नमवून ते सातव्यांदा असा पराक्रम करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.