विश्वविजेत्या महिला कबड्डी संघाचा गौरव

बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या महिलांच्या कबड्डी विश्वचषकात २४ नोव्हेंबर रोजी विजय मिळवून परतलेल्या भारतीय महिला कबड्डी संघाचा शुक्रवारी प्रो कबड्डी लीग (पीकेएल) आणि जिओस्टार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विश्वविजेत्या महिला कबड्डी संघाचा गौरव
विश्वविजेत्या महिला कबड्डी संघाचा गौरव
Published on

मुंबई : बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या महिलांच्या कबड्डी विश्वचषकात २४ नोव्हेंबर रोजी विजय मिळवून परतलेल्या भारतीय महिला कबड्डी संघाचा शुक्रवारी प्रो कबड्डी लीग (पीकेएल) आणि जिओस्टार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

भारताने अंतिम सामन्यात चायनीज तैपईचा ३५-२८ असा पराभव करून सलग दुसरा विश्वचषक जिंकला. भारत संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. सर्व गट सामने जिंकल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इराणचा ३३-२१ असा पराभव केला. चायनीज तैपेईने देखील आपल्या गटात अपराजित राहत यजमान बांगलादेशला २५-१८ असे हरवून अंतिम फेरी गाठली होती.

जिओस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी इशान चॅटर्जी यांनी या ऐतिहासिक वर्षात महिला क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल मत व्यक्त केले. “भारतीय महिलांच्या कबड्डी संघाचे हे अपूर्व यश हा केवळ ट्रॉफी जिंकण्याचा विषय नाही, ते देशभरातील तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्या आता या संघाकडे पाहून म्हणू शकतात ‘त्या करू शकतात, तर मीही करू शकते,” असे ते म्हणाले.

पीकेएल लीगचे अध्यक्ष आणि मशाल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड, अनुपम गोस्वामी यांनी महिलांच्या कबड्डीसाठी असलेल्या दीर्घकालीन दृष्टीकोनावर भर दिला. त्यांनी सांगितले, “फेडरेशनची बांधिलकी विशेषतः १२ वर्षांनी महिला विश्वचषक परत आणणे हा क्रीडा क्षेत्राला योग्य दिशेने नेणारा टप्पा आहे. हा विश्वचषक विजय केवळ जिंकण्यापुरता नाही; तर आपल्यासाठी एक सामाईक जबाबदारी आहे.”

मुख्य प्रशिक्षक व्ही. तेजस्विनी बाई यांनी संघाच्या प्रगती आणि तयारीबद्दल सांगितले, “ही तिसरी वेळ आहे की मी अशा प्रशिक्षक गटाचा भाग आहे ज्यांनी पदक जिंकले आहे. यांपैकी प्रत्येक वेळ विशेष आहे. मला फक्त निकालाचा अभिमान नाही, तर या संपूर्ण प्रवासाचा अभिमान आहे. हा विजय म्हणजे शिस्तबद्ध तयारीच्या महिन्यांचे फलित आहे,” असे त्या म्हणाल्या. कर्णधार ऋतु नेगीने संघाच्या एकजुटीबद्दल मत मांडले. यावेळी एकेएफआयचे अध्यक्ष विभोर जैनसुद्धा उपस्थित होते.

“शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे मला जास्त खेळता आले नाही, आणि ते नक्कीच खटकलं. पण आमचा संघ कोणत्याही एका खेळाडूपेक्षा मोठा आहे. महत्त्वाचं म्हणजे आमच्या खेळाडूंनी पुढाकार घेतला आणि गरजेनुसार प्रदर्शन केले. विश्वचषक जिंकून आणि देशभरातून माननीय पंतप्रधानांसह मिळालेला सन्मान पाहून आमचे कष्ट खरंच भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याची जाणीव होते,” असे ऋतु म्हणाली.

एकंदर या सत्कार सोहळ्यात फक्त संघाच्या उल्लेखनीय विजयाचा नव्हे, तर भारतातील महिलांच्या कबड्डीला मिळत असलेल्या वाढत्या गतीचा उत्सव साजरा करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in