भारतीय महिलांचे मालिकेत निर्भेळ यश; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून वर्चस्व

IND vs SA, 3rd ODI: दीप्ती शर्माने (२७ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला स्मृती मानधनाच्या (८३ चेंडूंत ९० धावा) आणखी एका तडाखेबाज खेळीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी आणि ५६ चेंडू राखून धुव्वा उडवला.
भारतीय महिलांचे मालिकेत निर्भेळ यश; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून वर्चस्व
PTI

बेंगळुरू : दीप्ती शर्माने (२७ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला स्मृती मानधनाच्या (८३ चेंडूंत ९० धावा) आणखी एका तडाखेबाज खेळीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी आणि ५६ चेंडू राखून धुव्वा उडवला. भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ५० षटकांत ८ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार लॉरा वोल्वर्ड (५७ चेंडूंत ६१) आणि ताझ्मिन ब्रीट्स (३८) यांनी १०२ धावांची सलामी नोंदवली. मात्र २०व्या व २१व्या षटकात या दोघी माघारी परतल्या व त्यांचा डाव घसरला. दीप्ती व अरुंधती रेड्डीने दोन बळी मिळवले.

त्यानंतर स्मृतीने ११ चौकारांसह ९० धावा केल्या. तिला सलग तिसऱ्या शतकाने मात्र हुलकावणी दिली. मग जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद १९) व रिचा घोष (नाबाद ६) यांनी ४०.४ षटकांत भारताचा विजय साकारला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ४२, तर प्रिया पुनियाने २८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

> दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ८ बाद २१५ (लॉरा वोल्वर्ड ६१, तांझिम ब्रीट्स ३८; दीप्ती शर्मा २/२७) पराभूत वि. भारत : ४०.४ षटकांत ४ बाद २२० (स्मृती मानधना ९०, हरमनप्रीत कौर ४२)

> सामनावीर : दीप्ती शर्मा

> मालिकावीर : स्मृती मानधना

भारत-आफ्रिका महिला एकदिवसीय मालिका

logo
marathi.freepressjournal.in