IND vs SL: विजयी आघाडी घेण्याची संधी! भारतीय महिला संघाचा आज तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेशी तिसरा सामना

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्धच्या पाच लढतींच्या टी-२० मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.
विजयी आघाडी घेण्याची संधी! भारतीय महिला संघाचा आज तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेशी तिसरा सामना
विजयी आघाडी घेण्याची संधी! भारतीय महिला संघाचा आज तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेशी तिसरा सामनाPhoto- X(@BCCIWomen)
Published on

तिरुवनंतपुरम : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्धच्या पाच लढतींच्या टी-२० मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उभय संघांतील तिसरा सामना रंगणार आहे.

२ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ दीड महिना विश्रांतीवर होता. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

आता महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळला आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताचे २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत पाच टी-२० सामने होणार आहेत. २१ व २३ तारखेला विशाखापट्टणम येथे, तर २६, २८ व ३० डिसेंबरच्या लढती तिरुवनंतपुरम येथे होतील. त्यानंतर ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. मग भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल.

दरम्यान, पहिल्या लढतीत भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या बळावर १२१ धावांचा सहज पाठलाग केला, तर दुसऱ्या लढतीत शफाली वर्माने धडाकेबाज अर्धशतक साकारून भारताला दुसरा विजय मिळवून दिला. गोलंदाजांनी या दोन्ही लढतींमध्ये छाप पाडून श्रीलंकेला १३० धावांपुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे भारताचेच पारडे तिसऱ्या लढतीसाठीदेखील जड मानले जात आहे. मात्र क्षेत्ररक्षणात नक्कीच सुविधेला वाव आहे. भारताने पहिल्या सामन्यात तब्बल पाच झेल सोडले. त्यांपैकी तीन झेल अतिशय सोपे होते.

तिरुवनंतपुरम येथे दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते. येथे आतापर्यंत फक्त पुरुषांचे चार टी-२० सामने झाले असून त्यांपैकी तीन वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. महिलांचा प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना ग्रीनफील्ड येथे होणार आहे.

दरम्यान, महिला संघासाठी लकी ठरलेल्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. या स्पर्धेच्या दोन दिवसांनंतर लगेच ७ फेब्रुवारीपासून पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. तसेच जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे आता महिला संघाचे लक्ष टी-२० सामन्यांवर अधिक असेल.

जेमिमा, शफालीवर फलंदाजीची भिस्त

पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे अर्धशतक झळकावणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज व सलामीवीर शफाली वर्मा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी स्मृती मानधना, हरमनप्रीत असे फलंदाजही भारताच्या ताफ्यात आहेत. भारताने प्रथम फलंदाजी घेतली, तर या दोघींपैकी एकीकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते. भारताकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी लांबलेली आहे. रिचा घोष, अमनजोत कौर यांच्यामध्येही गरजेनुसार फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

अग्रस्थानावरील दीप्ती परतणार

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली दीप्ती शर्मा या लढतीसाठी संघात परतेल. तापामुळे दीप्ती दुसऱ्या सामन्याला मुकली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच दीप्तीने जागतिक टी-२० अष्टपैलू क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली. त्यामुळे दीप्तीच्या पुनरागमनामुळे भारताची बाजू आणखी बळकट होईल. कारकीर्दीत प्रथमच दीप्तीने क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. तसेच गोलंदाजीत श्री चरणी व वैष्णवी शर्मा या डावखुऱ्या फिरकीपटूंची जोडी भारताची ताकद आहे. क्रांती गौड व अरुंधती रेड्डी असे वेगवान गोलंदाजीचे पर्यायही भारताकडे आहेत. भारताने रेणुका सिंगला अद्याप संधी दिलेली नाही. तसेच यष्टिरक्षक गुनालन कमलिनीदेखील प्रतीक्षा करत आहे. एकूणच भारताचा समतोल पाहता त्यांना रोखणे श्रीलंकेला कठीण जाईल.

अटापटू, रणवीराकडून श्रीलंकेला अपेक्षा

श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटू व अनुभवी गोलंदाज इनोका रणवीरा यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेचा महिला संघ सातत्याने संघर्ष करत असून त्यांनी भारताविरुद्ध गेल्या ११ पैकी ९ टी-२० सामने गमावले आहेत. त्यांना एकदिवसीय विश्वचषकातसुद्धा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. किमान टी-२० प्रकारात ते कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा असे प्रतिभावान फलंदाज श्रीलंकेकडे आहेत. मात्र एकंदर सांघिक कामगिरी उंचावण्यात ते अपयशी ठरत आहेत. त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंका काय करणार, याकडे लक्ष असेल.

उभय महिला संघांत आतापर्यंत २८ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २२, तर श्रीलंकेने फक्त ५ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आलेला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग, रिचा घोष, गुनालन कमलिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

श्रीलंका : चामरी अटापटू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, शशिनी गिम्हानी, विश्मी गुणरत्ने, कौशिनी नुथायगना, काव्या काविंदी, मालकी मदारा, निमाशा मीपागे, हसिनी परेरा, इनोका रनवीरा, रश्मिका सेवांदी, मालशा स्नेहानी, निलाशिका सिल्व्हा.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in