भारतीय महिलांची आज वानखेडेवर ऑस्ट्रेलियाशी गाठ

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल. मात्र चार नव्या चेहऱ्यांना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे
भारतीय महिलांची आज वानखेडेवर ऑस्ट्रेलियाशी गाठ
PM

मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आता गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतही वर्चस्वपूर्ण कामगिरीचे ध्येय बाळगून भारतीय संघ मैदानात उतरेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना होईल.

इंग्लंड व ऑस्ट्रेलियाला कसोटीमध्ये नमवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय प्रकारात भारताची कामगिरी नेहमीच निराशाजनक झालेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५० एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने फक्त १० लढती जिंकल्या आहेत, तर ४० सामन्यांत कांगारूंनी बाजी मारली आहे. त्यातही मायदेशातील २१ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने फक्त ४ सामने जिंकले आहेत. २००७पासून भारताने ऑस्ट्रेलियाला एकदाही मायदेशात एकदिवसीय सामन्यात नमवलेले नाही, हे विशेष.

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल. मात्र चार नव्या चेहऱ्यांना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. साईका इशाक, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप आणि तितास साधू या चौघींवर सर्वांचे लक्ष असेल. रेणुका सिंग वेगवान गोलंदाजीची धुरा वाहेल. दुसरीकडे, एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघात एलिस पेरी, बेथ मूनी, अॅश्लेघ गार्डनर, ताहिला मॅकग्रा अशा एकापेक्षा एक अव्वल खेळाडूंचा समावेश असून एकदिवसीय क्रमवारीत हा संघ अग्रस्थानी असल्याने भारताला त्यांना नमवण्यासाठी कडवी मेहनत करावी लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in