तब्बल आठ विकेट्सने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत भारतीय महिलांनी शनिवारी टी-२० आशिया चषकावर सातव्यांदा नाव कोरले. स्मृती मानधनाने (२५ चेंडूंत नाबाद ५१ धावा) विजयी षटकार लगावला. पाच धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेणाऱ्या रेणुका सिंगला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले; तर मालिकेत ९४ धावा आणि १३ विकेट्स मिळविणाऱ्या दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द सीिरज म्हणून सन्मानित करण्यात आले.
विजयासाठीचे अवघे ६६ धावांचे लक्ष्य भारतीय महिला संघाने ८.३ षटकांत अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात ७१ धावा करीत साध्य केले. सलामीवीर स्मृती मानधनाने २५ चेंडूंत नाबाद ५१ धावा फटकावताना तीन षटकार आणि सहा चौकार लगावत विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर स्मृतीने फटकेबाजी करत भारताला ३ षटकांतच २५ धावांपर्यंत पोहोचविले. यावेळी श्रीलंकेनेही भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. झुंजार फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या रणवीराने गोलंदाजीतही चमक दाखवत भारताला पहिला धक्का दिला. तिने ८ चेंडूंत ५ धावा करणाऱ्या शफाली वर्माला बाद केले. संजीवनीने तिला यष्टिचीत केले. कविशा दिलहारीने जेमिमाह रॉड्रिग्जचा २ धावांवर त्रिफळा उडविला.
मानधना २०४ च्या स्ट्राइक रेटने खेळली. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाबाद ११ धावा केल्या. या दोघींच्या फटकेबाजीमुळे भारताने हा माफक आव्हानाचा एकतर्फी सामना सहजगत्या जिंकला. श्रीलंका संघाकडून इनोका रणवीरा आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.
त्याआधी, बांगलादेशातील महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवातच मुळी निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ गारद झाला. एका क्षणी श्रीलंकेच्या ५० धावा तरी होतील की नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. भारताच्या प्रभावी गोलंदाजीपुढे एकही फलंदाज टिकू शकला नाही. इनोका रणविरा (२२ चेंडूंत नाबाद १८ धावा) आणि ओशाडी रणसिंघे (२० चेंडूंत नाबाद १३ धावा) या दोघींनाच दोन आकडी संख्या गाठता आली. श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद ६५ धावाच करता आल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक तीन विकेट्स मिळविल्या. स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.