भारतीय महिलांचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून दमदार विजय, शूटची भेदक गोलंदाजी

मध्यमगती गोलंदाज मेगान शूटने १९ धावांत ५ बळी मिळवून भारतीय फलंदाजांची दैना उडवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. भारताला १०० धावांत गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने १६.२ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.
भारतीय महिलांचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून दमदार विजय, शूटची भेदक गोलंदाजी
Published on

ब्रिस्बेन : मध्यमगती गोलंदाज मेगान शूटने १९ धावांत ५ बळी मिळवून भारतीय फलंदाजांची दैना उडवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. भारताला १०० धावांत गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने १६.२ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

ब्रिस्बेनला झालेल्या या लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र शूटसमोर भारताचा संघ ३४.२ षटकांत १०० धावांत गारद झाला. स्मृती मानधना (८), हरमनप्रीत (१७), जेमिमा रॉड्रिग्ज (२३) यांनी निराशा केली. प्रिया पुनिया (३), रिचा घोष (१४), दीप्ती शर्मा (१) यादेखील छाप पाडू शकल्या नाहीत.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने बिनबाद ४८ धावा केल्या. मात्र रेणुका ठाकूरने ३ बळी घेत चुरस निर्माण केली. तिने फोबे लिचफील्ड (३५), एलिस पेरी (१), बेथ मूनी (१) यांचे बळी मिळवले. मात्र जॉर्जिया वॉलने नाबाद ४६ धावा फटकावून १७व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. प्रिया मिश्राने २ बळी मिळवले. मात्र ती व रेणुका भारताचा विजय साकारू शकले नाहीत. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना रविवारी खेळवण्यात येईल.

भारताला काही महिन्यांपूर्वी झालेल्या टी-२० विश्वचषकात साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर मायदेशात भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत २-१ असे नमवले. आता पुढील वर्षी भारतातच महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने आतापासून संघबांधणी करायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in