नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार व अनुभवी आक्रमकपटू राणी रामपालने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. गेली १६ वर्षे भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केल्यावर वयाच्या २९व्या वर्षीच राणीने हॉकीला अलविदा केला आहे.
२००८मध्ये अवघ्या १४ वर्षांची असताना हॉकीमध्ये आपल्यी स्टीकची जादू दाखवणाऱ्या राणीने भारतासाठी २५४ सामन्यांत २०५ गोल केले. राणीच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र तेथे भारताला दुर्दैवाने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने ऐतिहासिक पदक हुकले. हरयाणामध्ये जन्मलेल्या राणीने ट्विटवर निवृत्तीची पोस्ट टाकली. “हा प्रवास संस्मरणीय होता. मात्र आता थांबण्याची योग्य वेळ आहे. भारतासाठी इतके वर्ष खेळू शकेन, असा कधी विचारही केला नव्हता,” असे राणी म्हणाली.
राणीने २०१४ व २०१८च्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या दोन्ही स्पर्धेत भारताने अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक पटकावले. २०१८च्या आशियाई स्पर्धेत राणीच भारताची कर्णधार होती. तसेच राणीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१६मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठी राणीला भारतीय संघात स्थान लाभले नाही. तेव्हापासूनच तिच्या निवृत्तीचा काळ जवळ आल्याचे संकेत मिळाले. राणीला २०२०मध्ये पद्मश्री तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
दरम्यान, राणीने २०२६च्या राष्ट्रकुलमधून हॉकीला वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारताने या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असेही सुचवले आहे.
राणीची जर्सीही निवृत्त व १० लाखांचे बक्षीस
भारतीय हॉकी महासंघाने भारत-जर्मनी यांच्यातील हॉकी सामना झाल्यानंतर राणीला खास आमंत्रित केले. तसेच तिची २८ क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्याशिवाय महासंघाकडून राणीला १० लाखांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडवियासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.