भारतीय महिला हॉकी संघाचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का; सविताच्या अफलातून कामगिरीमुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी

गोलरक्षक सविता पुनियाने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये मंगळवारी विश्वविजेत्या तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नेदरलँड्सला २-२ (२-१) असा पराभवाचा धक्का दिला.
भारतीय महिला हॉकी संघाचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का; सविताच्या अफलातून कामगिरीमुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी
एक्स @baxiabhishek
Published on

भुवनेश्वर : गोलरक्षक सविता पुनियाने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये मंगळवारी विश्वविजेत्या तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नेदरलँड्सला २-२ (२-१) असा पराभवाचा धक्का दिला.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत नेदरलँड्सकडे २-० अशी आघाडी होती. पीन सँडर्स व व्हॅन डर विस्ट यांनी अनुक्रमे १७ व २८व्या मिनिटाला त्यांच्यासाठी गोल केला. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने झोकात पुनरागमन केले. दीपिका सेहरावतने ३५व्या मिनिटाला भारतासाठी पहिला, तर बलजीत कौरने ४३व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. निर्धारित वेळेत बरोबरी कायम राहिल्याने सामना शूटआऊटपर्यंत लांबला.

शूटआऊटमध्ये मग सविताने सँडर्स, विस्ट, लुना फोक व डीक यांचे प्रयत्न थोपवून धरले. फक्त वीनने नेदरलँड्ससाठी गोल केला. तर भारतासाठी दीपिका व मुमताझ खान यांनी शूटआऊटमध्ये गोल नोंदवून संघाचा ऐतिहासिक विजय साकारला. काही दिवसांपूर्वीच नेदरलँड्सने भारताला २-४ असे नमवले होते. त्याचाही भारताने वचपा घेतला. भारतीय संघ तूर्तास ८ सामन्यांतील २ विजय व १ बरोबरीच्या ९ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. जूनपर्यंत हॉकी लीग रंगणार आहे.

महासंघाकडून प्रत्येक खेळाडूला १ लाख

भारतीय हॉकी महासंघाने नेदरलँड्सविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयासाठी भारतीय महिलांचे अभिनंदन केले आहे. तसेच संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाखाचे पारितोषिक जाहीर केले आहे. त्याशिवाय प्रशिक्षकांच्या फळीतील प्रत्येकाला ५० हजार रुपये देण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in