
हांगझो (चीन) : भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत थाटात प्रवेश केला. भारताने ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सिंगापूरचा १२-० असा धुव्वा उडवून अग्रस्थानासह आगेकूच केली. मुमताझ खान व नवनीत कौर यांनी गोल हॅटट्रिक साकारून विजयात मोलाची भूमिका बजावली. आता १० सप्टेंबरपासून सुपर-फोर फेरी सुरू होईल.
एकीकडे बिहारमध्ये रविवारी भारतीय पुरुषांनी आशिया चषक उंचावल्यावर आता चीनमध्ये भारतीय महिलासुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील, अशी आशा आहे. या स्पर्धेच्या ब-गटात भारत, थायलंड, जपान, सिंगापूरचा समावेश होता, तर अ-गटात चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया व चायनीज तैपई हे संघ होते. चीननंतर भारतीय संघ या स्पर्धेत क्रमवारीत वरच्या स्थानी आहे. या स्पर्धेतील विजेता २०२६च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. सलिमा टेटे भारताचे नेतृत्व करत आहे. हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघ खेळत आहे.
दरम्यान, भारताने साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात थायलंडचा ११-० असा फडशा पाडला होता. मग भारताने जपानला २-२ असे बरोबरीत रोखले. सोमवारी तिसऱ्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. मुमताजने दुसऱ्याच मिनिटाला गोलखाते उघडले. मग नेहा गोयल (११), लालरेमसियामी (१३) आणि उदिता (२९)यांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवला. नवनीतने अनुक्रमे १४, २० व २८व्या मिनिटाला गोल झळकावत हॅटट्रिक साकारली. त्यामुळे मध्यांतरालाच भारताने ७-० अशी आघाडी घेतली.
मग तिसऱ्या सत्रात मुमताने (३२ व ३९) आणखी दोन गोल नोंदवले. नेहानेसुद्धा वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. मग शर्मिला देवीने ४५व्या, तर महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळने ५३व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाच्या १२-० अशा विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. सिंगापूरच्या बचावाला एकदाही भारताचे आक्रमण रोखता आले नाही. तसेच भारताने संपूर्ण लढतीत त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर मिळू दिला नाही.
भारताने ब-गटात ३ सामन्यांतील २ विजय व १ बरोबरीसह ७ गुण मिळवले. जपाननेसुद्धा इतक्याच गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. भारताने जपानच्या तुलनेत अधिक गोल झळकावल्याने त्यांनी अग्रस्थान पटकावले. अ-गटातून चीन व दक्षिण कोरिया यांनी सुपर-फोर फेरी गाठली.
विजेत्या पुरुष संघाला दुहेरी बक्षीस
आशिया चषक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला दुहेरी पारितोषिक जाहीर करण्यात आले. भारतीय हॉकी महासंघाने प्रत्येक खेळाडूला ३ लाख, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. त्याशिवाय हॉकी महासंघातर्फे प्रशिक्षण चमूतील प्रत्येक सदस्याला १.५ लाख, तर बिहार शासनातर्फे प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येतील. राजगिर (बिहार) येथे या स्पर्धेचे उत्तम आयोजन करण्यात आले. या जेतेपदासह भारताने २०२६च्या हॉकी विश्वचषकाची थेट पात्रता मिळवली.