
विशाखापट्टणम : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ गुरुवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साकारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मात्र त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असून या लढतीत प्रामुख्याने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यापैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. यावेळी महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.
दरम्यान, भारताने आतापर्यंत स्पर्धेत अनुक्रमे श्रीलंका व पाकिस्तान या दोन आशियाई देशांना धूळ चारली आहे. मात्र दोन्ही सामन्यांत भारताचे आघाडीचे ३-४ फलंदाज अपयशी ठरले आहेत. चांगल्या सुरुवातीचा लाभ घेत त्यांना मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या बळावरच भारताने दोन्ही लढती जिंकल्या आहेत, असे म्हणू शकतो. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडला नमवून येत असल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांचा आणखी कस लागणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताने २६९ धावा केल्या, तर पाकिस्तानविरुद्ध भारत २४७ धावांत गारद झाला.
१९७३पासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे दर चार वर्षांनी यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. यंदा साखळी फेरीत प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व न्यूझीलंड हे आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेतील आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २ नोव्हेंबरला विजेता ठरेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, तर न्यूझीलंडने एकदा महिला विश्वचषक जिंकला आहे.
दरम्यान, भारताचा संघ सलग दोन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६ गुणांसह पहिल्या, तर इंग्लंड ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा नेट रनरेट भारतापेक्षा सरस आहे. त्यामुळे भारताला या गोष्टीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. भारताची अग्निपरीक्षा आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.
स्मृती, हरमनप्रीत यांच्याकडून आशा
भारताची कर्णधार हरमनप्रीतने दोन सामन्यांत अनुक्रमे २१ व १९ धावा केल्या आहेत. तसेच सलामीवीर व उपकर्णधार स्मृती मानधनाला ८ व २३ धावाच करता आल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतिका रावल यांनीही छाप पाडलेली नाही. हरलीन देओलने दोन सामन्यांत अनुक्रमे ४८ व ४६ धावा केल्या असल्या, तरी ती त्यासाठी पुष्कळ चेंडू घेत आहे. त्यामुळे धावगती कमी होऊन अन्य फलंदाजांवर दडपण येते. प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाजांनीच भारताला आतापर्यंत तारले आहे. दीप्ती शर्माने दोन सामन्यांत अष्टपैलू योगदान दिले आहे. तसेच रिचा घोष, स्नेह राणादेखील फटकेबाजी करत आहेत. आफ्रिकेनंतर भारताची ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या बलाढ्य संघांशी गाठ पडणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आता खरोखरच कामगिरी उंचवावी लागणार असून ५० षटकांत किमान ३०० धावांचे लभ्य उभारावे लागेल.
दीप्ती, क्रांतीवर गोलंदाजीत भिस्त
गोलंदाजीत भारताला दीप्ती व स्नेह राणा या फिरकी जोडीकडून पुन्हा कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध ३ बळी मिळवून छाप पाडणारी युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड पुन्हा एकदा चमक दाखवण्यास आतुर असेल. रेणुका सिंगनेही गेल्या लढतीत लय मिळवली आहे. त्यामुळे अमनजोत कौर तंदुरुस्त असल्यास तिला लगेच संघात स्थान मिळणार की रेणुकावरच भारतीय संघ विश्वास दर्शवणार, हे पाहणे रंजक ठरेल. श्री चरिणीचा फिरकी पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे.
मलाबा, ब्रिट्सकडून धोका
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वर्डला अद्याप स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र आक्रमक सलामीवीर ताझ्मिन ब्रिट्स व डावखुरी फिरकीपटू नॉनकुलुलेको मलाबा यांच्यापासून भारताला सावध रहावे लागेल. ब्रिट्सने न्यूझीलंडविरुद्ध ८९ चेंडूंत १०१ धावांची खेळी साकारली होती. त्याशिवाय सून लूस, वेगवान गोलंदाज आयाबोंगा खाका व अष्टपैलू मॅरीझेन काप यांच्यावर आफ्रिका संघाची भिस्त आहे. आफ्रिकेने २ पैकी १ सामना जिंकला असून तूर्तास ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत त्यांचा संघ गारद झाला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्ध आफ्रिकेने उत्तम कामगिरी करून विजय मिळवला.
विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेत खेळणार असून येथे फलंदाजांना सहाय्य लाभू शकते. तसेच दोन दिवसांपूर्वी येथे पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे लढतीच्या दिवशीही पाऊस येऊ शकतो.