भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी मिळवला विजय
‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२२ मध्ये विजयी सलामी दिली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने जेमिमाह रॉड्रिग्जच्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (३० चेंडूंत ३३ धावा) यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर निर्धारित २० षट्कांत भारताने सहा बाद १५० धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १८.२ षट्कांत १०९ धावांत गारद झाला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. तिसऱ्या षट्कातील तिसऱ्या चेंडूवर कर्णधार चमारी अट्टापटू (११ चेंडूंत ५ धावा) करून बाद झाली. त्यावेळी संघाची धावसंख्या अवघी २५ होती. शर्माने तिला रेणुका सिंगच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर श्रीलंकेच्या बॅटर्स विशिष्ट अंतराने बाद होत राहिल्या. भारताची गोलंदाज हेमलता दयालनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले. पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविले. राधा यादवला श्रीलंकेकडून हसिनी परेरा हिने सर्वाधिक म्हणजेच ३२ चेंडूत ३० धावा केल्या.
त्याआधी, भारताने प्रथम फलंदाजी करताना अडखळत सुरुवात केली. शेफाली वर्मा (११ चेंडूंत १० धावा) आणि स्मृती मानधना (७ चेंडूंत ६ धावा लवकर बाद झाल्या. भारताच्या डावाची चार षट्के पूर्ण झाली असता धावसंख्या दोन गडी गमावत २३ एवढी होती. भारताची स्थिती नाजूक असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत जेमिमाहने अर्धशतकी खेळी केली आहे. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला.