

वडोदरा : सलामीवीर स्मृती मानधनाच्या (१०२ चेंडूंत ९१ धावा) दमदार अर्धशतकाला मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगच्या (२९ धावांत ५ बळी) अफलातून कामगिरीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला तब्बल २११ धावांनी नेस्तनाबूत केले. भारताचा हा विंडीजवर एकदिवसीय प्रकारातील सर्वात मोठा विजय ठरला. तर एकंदर विचार करता हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय आहे.
कोटांबी स्टेडियम, वडोदरा येथे झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या ३१५ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ २६.२ षटकांत १०३ धावांत गारद झाला. २८ वर्षीय रेणुकाने एकदिवसीय कारकीर्दीत प्रथमच एका डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. तिच सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मंगळवारी दुसरा सामना खेळवण्यात येईल. या मालिकेपूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत भारतानेच २-१ असे यश संपादन केले होते.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ बाद ३१४ अशी धावसंख्या उभारली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्मृतीने एकदिवसीय कारकीर्दीतील २७वे अर्धशतक साकारले. टी-२० मालिकेत स्मृतीने सलग तीन अर्धशतके झळकावली होती. पदार्पणवीर प्रतिका रावलने उपयुक्त ४० धावा केल्या. या दोघींनी २३ षटकांत ११० धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील हरलीन देओलने ५० चेंडूंत ४४ धावा करताना स्मृतीसह दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भर घातली. झैदा जेम्सने स्मृतीचा ९१ धावांवर अडथळा दूर केला. तिने १३ चौकार लगावले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (२३ चेंडूंत ३४) व हरलीन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. मात्र हरलीन बाद झाली व भारताचा डाव काहीसा घसरला. अन्यथा भारताला ३२५ धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. रिचा घोष (१३ चेंडूंत २६), जेमिमा रॉड्रिग्ज (१९ चेंडूंत ३१) यांनी उपयुक्त फटकेबाजी केली. फिरकीपटू झाईदा जेम्सने ५ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रेणुकापुढे विंडीजची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. तिने एका बाजूने सलग आठ षटके टाकली. पहिल्याच चेंडूवर क्विना जोसेफ धावचीत झाली. मग रेणुकाने हीली मॅथ्यूज (०), दिएंड्रा डॉटिन (८), आलिया अलेन (१३), शबलिका गजनबी (३) यांना बाद केले. हरमनप्रीतने अलेनचा हवेत सूर मारून एक हाती झेल टिपला. विंडीजची एकवेळ ६ बाद ३४ अशी स्थिती होती. मात्र शीमेन कॅम्पबेल (२१) व अफी फ्लेचर (नाबाद २४) यांनी काहीसा प्रतिकार करून विंडीजला शतक गाठून दिले. अखेर रेणुकाने कॅम्पबेलला बाद करून बळींचे पंचक पूर्ण केले. प्रिया मिश्राने शमिला कोनेलला बाद करून विंडीजचा संघ २६.२ षटकांत १०३ धावांत गुंडाळला.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ९ बाद ३१४ (स्मृती मानधना ९१, हरलीन देओल ४४; झाईदा जेम्स ५/४५) विजयी वि. g वेस्ट इंडिज : २६.२ षटकांत सर्व बाद १०३ (अफी फ्लेचर नाबाद २४, शीमेन कॅम्पबेल २१; रेणुका सिंग ५/२९)
सामनावीर : रेणुका सिंग
भारताने विंडीजला २११ धावांनी धूळ चारली. हा त्यांचा एकदिवसीय प्रकारातील विंडीजविरुद्ध सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २००४मध्ये भारताने त्यांना १७० धावांनी नमवले होते.
भारताचा हा एकदिवसीय प्रकारातील धावांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. २०१७मध्ये भारताने आयर्लंडला २४९ धावांनी धूळ चारली होती.