Aman Sehrawat
अमन सेहरावतने १० तासांत ४.६ किलो वजन घटवले

१० तासांत ४.६ किलो वजन घटवले, अन्यथा अमनही विनेशसारखा अपात्र ठरला असता

अंतिम फेरीत पोहोचूनही १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगट हिला पदकापासून वंचित राहावे लागले असले तरी अमन सेहरावत याने मात्र एका रात्रीत फक्त १० तासात चक्क ४.६ किलो वजन कमी करण्याची करामत केली.
Published on

पॅरिस : 'पुढच्याला ठेच, मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे अमन सेहरावत हा नशीबवान ठरला आहे. अंतिम फेरीत पोहोचूनही १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगट हिला पदकापासून वंचित राहावे लागले असले तरी अमन सेहरावत याने मात्र एका रात्रीत फक्त १० तासात चक्क ४.६ किलो वजन कमी करण्याची करामत केली. त्यामुळेच त्याला कांस्यपदकापर्यंत झेप घेता आली.

भारताचा सर्वात युवा ऑलिम्पिक पदकविजेता असा मान मिळवणाऱ्या अमनने दुसऱ्या दिवशी वजन तपासणीआधी अक्षरश: रक्ताचे पाणी केले. जपानच्या रेई हिगुचीविरुद्धची उपांत्य लढत गमावल्यानंतर अमनचे वजन ६१.५ किलो इतके भरले होते. तो ५७ किलो वजनी गटात खेळत होता. त्यामुळेच त्याला कांस्यपदकासाठीच्या लढतीसाठी रिंगणात उतरण्यापूर्वी ४.५ किलोपेक्षा जास्त वजन कमी करणे क्रमप्राप्त होते. अन्यथा त्याच्यावरही विनेश फोगटसारखीच परिस्थिती ओढवली असतील.

अमनसह त्याचे प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि विरेंदर दहिया यांनी हे शिवधनुष्य पेलत अमनला ४६.९ किलो वजनासह कांस्यपदकासाठीच्या लढतीत उतरवले. उपांत्य लढत हरल्यानंतर अमनने वेळ वाया न घालवता जवळपास दीड तास मॅटवर घालवला. त्यानंतर एक तास गरम पाण्यात बसून होता. १२.३० वाजता तो जिममध्ये गेला, त्यानंतर एक तास अविरतपणे ट्रेडमिलवर धावण्याचा सराव केला. स्वेटसूट (घाम गाळण्याचा पेहराव) घालून सराव करण्याचा फायदा त्याला झाला. त्यानंतर ३० मिनिटे विश्रांती घेत त्याने आणखीन पाच सत्रात सराव केला. अखेरच्या सत्रात अमनचे वजन ९०० ग्रॅम अधिक होते. त्यानंतर दोन्ही प्रशिक्षकांनी त्याला जॉगिंग करण्याचा सल्ला दिला. प्रत्येकी १५ मिनिटे असा पाच वेळा धावण्याचा सराव केल्यानंतर सकाळी ४.३० वाजता त्याचे वजन ५६.९ किलो इतके झाले. त्यानंतर अमनने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यानच्या सत्रात अमनने लिंबू आणि मधयुक्त गरम पाणी प्यायले. तसेच काही वेळी कॉफीसुद्धा घेतली. पूर्ण रात्रभर त्याने एक क्षणही झोप घेतली नाही.

"महत्त्वाच्या स्पर्धेसाठी वजन कमी करणे हे आमच्यासाठी नित्यनेमाचे असते. मात्र विनेशच्या बाबतीत जे काही घडले, त्यानंतर यावेळी आमच्यावर प्रचंड दडपण होते. आम्ही आणखी एक पदक वाया घालवू इच्छित नव्हतो. प्रत्येक तासाभरानंतर आम्ही अमनचे वजन पडताळून पाहत होतो. आमच्यापैकी कुणीही झोपला नाही, संपूर्ण रात्र आणि दिवसभर आम्ही कठोर परिश्रम घेतले", असे अमनचे प्रशिक्षक दहिया यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in