स्पॅनिश ग्रांप्री कुस्ती स्पर्धा: विनेशचे 'सोनेरी यश'

पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून देताना भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रांप्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावले.
स्पॅनिश ग्रांप्री कुस्ती स्पर्धा: विनेशचे 'सोनेरी यश'
PTI
Published on

नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून देताना भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रांप्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावले. विशेष म्हणजे विनेशने ५० किलो वजनी गटात प्रथमच खेळताना हे यश मिळवले आहे.

सुवर्णपदकाच्या लढतीत विनेशने मारिआ तिऊमेरेकेवाचा गुणांवर १०-५ असा पराभव केला. मारिआ ही मूळ रशियाची आहे, पण रशियावर असलेल्या निर्बंधामुळे मरियाला या स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर सहभाग घ्यावा लागला. अगदी ऐनवेळी व्हिसा मिळाल्यानंतर स्पेनमध्ये दाखल झालेल्या विनेशने नंतर सलग तीन लढतींत सफाईदार विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती.

विनेशने प्रथम पॅन-अमेरिकन विजेत्या युस्नलिस गुझमानचा १२- ४ असा पराभव केला, मग कॅनडाच्या मॅडिसन पार्कला चीतपट केले. उपांत्य फेरीत विनेशने कॅनडाच्याच कॅटिक डचॅकला गुणांवर ९-४ असे पराभूत केले होते. आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फ्रान्सला रवाना होणार आहे.

ऑलिम्पिक पदकाने जीवन बदलते!

ऑलिम्पिकमधील पदकाने खेळाडूचे जीवनच बदलते. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनहीं बदलतो आणि खेळाडूसाठी अनेक नव्या संधी निर्माण होतात, असे मत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केले. ऑलिम्पिक पदक मिळवणारी साक्षी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. "ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे एकट्या खेळाडूचे नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न असते. ते सत्यात उतरत असताना पदकाची कमाई झाली, तर खेळाडूबरोबरच त्याच्या कुटुंबाचे आणि तो राहत असलेल्या गावाचेही जीवन बदलून जाते," असे साक्षीने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in