भारतीय युवा फुटबॉल संघाची २० वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी; बांगलादेशला ३-० असे नमवून आशियाई चषकासाठी पात्र

भारतीय युवा फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक (२० वर्षांखालील) पात्रता फेरीतील अंतिम साखळी सामन्यात बांगलादेशचा ३-० असा एकतर्फी पराभव केला.
भारतीय युवा फुटबॉल संघाची २० वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी; बांगलादेशला ३-० असे नमवून आशियाई चषकासाठी पात्र
भारतीय युवा फुटबॉल संघाची २० वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी; बांगलादेशला ३-० असे नमवून आशियाई चषकासाठी पात्र(Photo-X@IndiaSportsHub)
Published on

ताश्कंद : भारतीय युवा फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक (२० वर्षांखालील) पात्रता फेरीतील अंतिम साखळी सामन्यात बांगलादेशचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. या दणदणीत विजयासह भारताने तब्बल २० वर्षांनंतर एएफसी आशियाई चषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत आपले स्थान पक्के केले. भारताने यापूर्वी २००६ मध्ये या मुख्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. महेश गवळी भारतीय युवा फुटबॉल संघाचे सध्या प्रशिक्षक आहेत.

या पात्रता फेरीत भारताचा हा दुसरा विजय ठरला असून, ३ सामन्यांतून ६ गुणांसह भारताने ब-गटात दुसरे स्थान मिळवले. रविवारी झालेल्या अन्य एका सामन्यात उझबेकिस्तानने सीरियाचा ३-० असा पराभव केला. त्यामुळे उझबेकिस्तान ९ गुणांसह गटविजेता ठरला, तर सर्व आठ गटांमधील अव्वल सात उपविजेत्या संघांमध्ये स्थान मिळवत भारताने मुख्य स्पर्धेची पात्रता सिद्ध केली. सीरिया ३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला, तर तिन्ही सामने गमावणारा बांगलादेश तळाचा संघ ठरला. ही मुख्य स्पर्धा २४ मार्च ते १० एप्रिल २०२७ दरम्यान चीनमध्ये आयोजित केली जाणार आहे.

महत्वाच्या सामन्यात डॅनी मेईतेई लैशरामने २५ व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर ६०व्या मिनिटाला विशाल यादवने उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. ७२व्या मिनिटाला मैदानात आलेल्या महंमद अर्बाशने ७९ व्या मिनिटाला जोरदार फटका मारत भारताच्या ३-० अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. २५व्या मिनिटाला डॅनी आणि हतीम अली यांच्यातील समन्वयामुळे बांगलादेशच्या बचाव फळीवर दबाव निर्माण झाला आणि डॅनीने सुरेख फिनिशिंग करत पहिला गोल डागला. ३४व्या मिनिटाला डॅनीचा फ्री-किकवरील प्रयत्न बांगलादेशच्या गोलरक्षकाने मोडीत काढला. मध्यंतरानंतर ६०व्या मिनिटाला थ्रो-इनवर ऋषिकान्तने दिलेला पास विशालने गोलमध्ये रुपांतरित केला. मुख्य प्रशिक्षक गवळी यांनी केलेले बदल निर्णायक ठरले आणि अर्बाशच्या गोलने भारताचा विजय सुकर केला.

दरम्यान, एएफसी युवा आशियाई चषक ही ‘आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन’ची (एएफसी) पुरुषांच्या २० वर्षांखालील राष्ट्रीय संघांसाठीची प्रमुख खंडीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत आशियातील आघाडीचे युवा संघ एकत्र येतात आणि वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आगेकूच करण्यास उत्सुक असलेल्या खेळाडूंसाठी हे एक महत्त्वाचे विकासाचे व्यासपीठ ठरते. त्यामुळे एकूणच भारतीय युवा संघाकडून आता चाहत्यांचा अपेक्षा वाढल्या आहेत.

पुढील आव्हान काय?

  • भारतीय संघापुढील पुढील आव्हान म्हणजे २०२७ मध्ये अझरबैजान आणि उझबेकिस्तान येथे होणाऱ्या युवा फिफा विश्वचषकासाठी (२० वर्षांखालील) पात्रता मिळवणे.

  • आशियाई चषक स्पर्धेत आशियातील आघाडीचे युवा संघ एकत्र येतात आणि वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आगेकूच करण्यास उत्सुक असलेल्या खेळाडूंसाठी हे एक महत्त्वाचे विकासाचे व्यासपीठ ठरते.

  • यजमान उझबेकिस्तानचा अपवाद वगळता, आशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन (एएफसी) मधील संघांसाठी चार जागा उपलब्ध आहेत. स्पर्धेत स्थान निश्चित करण्यासाठी भारताला पात्रता फेरीतील उपांत्य फेरीपर्यंत मजल मारावी लागेल.

  • भारतीय संघ आजवरच्या इतिहासात कधीही या जागतिक युवा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाहीत. याआधी महिला संघ विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडावे लागले होते. पात्रता फेरीच्या आशियाई टप्प्यासाठी गट-रचनेची (ड्रॉ) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in