युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-भारतीय युवा संघाचा आज आफ्रिकेशी उपांत्य सामना

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला मंगळवारी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी दोनहात करायचे आहेत. गतविजेत्या भारताला सलग पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-भारतीय युवा संघाचा आज आफ्रिकेशी उपांत्य सामना

बेनोनी : उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला मंगळवारी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी दोनहात करायचे आहेत. गतविजेत्या भारताला सलग पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

भारताने साखळी स्पर्धेत बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका या संघांचा धुव्वा उडवला. त्यानंतर सुपर-सिक्स फेरीत न्यूझीलंड व नेपाळ यांचाही भारताने फडशा पाडला. मुख्य म्हणजे पाचपैकी तीन सामने भारताने २००पेक्षाही अधिक धावांच्या फरकाने जिंकल्या. त्यामुळे स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचेच पारडे जड मानले जात आहे. मुंबईकर मुशीर खानने या विश्वचषकात ५ सामन्यांत सर्वाधिक ३३४ धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताचा डावखुरा फिरकीपटू सौम्य पांडे १६ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त मधल्या फळीत उदय, अर्शीन कुलकर्णी, वेगवान गोलंदाज नमन तिवारी यांनीही भारतासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

दुसरीकडे आफ्रिकेने ब-गटात अग्रस्थान मिळवून सुपर-सिक्स फेरी गाठली. तेथे त्यांनी झिम्बाब्वे व श्रीलंकेला धूळ चारली. आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाने स्पर्धेत सर्वाधिक १८ बळी मिळवले आहेत. विश्वचषकापूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत भारताने आफ्रिकेला दोन वेळा नमवले होते. त्यामुळे ते यावेळीही आफ्रिकेला नमवतील, अशी आशा आगे. गुरुवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील. रविवार, ११ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. भारताने आतापर्यंत पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.

वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in