भारतीय संघाची घोषणा एप्रिलअखेरीस होणार; टी-२० वर्ल्डकपसाठी निवड समितीचे लक्ष खेळाडूंच्या कामगिरीवर

भारतीय संघाची निवड करण्यासाठी सध्या निवड समिती कामाला लागली असून निवड समितीतील चार सदस्य सध्या दररोजच्या सामन्यांना हजेरी लावत आहेत किंवा टीव्हीवरून सामने पाहून खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत.
भारतीय संघाची घोषणा एप्रिलअखेरीस होणार; टी-२० वर्ल्डकपसाठी निवड समितीचे लक्ष खेळाडूंच्या कामगिरीवर

नवी दिल्ली : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी संघ पाठवण्याची अंतिम तारीख १ मे ही असणार आहे.

सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आपापल्या घोषित संघातील खेळाडू बदलण्याची संधी २५ मेपर्यंत मिळणार आहे. “भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंची कामगिरी आणि फिटनेस पाहता, खेळाडूंची निवड केली जाणार आहे,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

“भारतीय संघातील खेळाडूंची पहिली तुकडी आयपीएलच्या साखळी फेरीचा टप्पा आटोपल्यानंतर १९ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. आयपीएलच्या बाद फेरीत स्थान न मिळवणाऱ्या संघातील भारतीय खेळाडू सर्वप्रथम अमेरिकेला प्रयाण करतील,” असेही त्यांनी सांगितले. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा होणार असल्यामुळे भारतीय संघासोबत काही राखीव खेळाडूंचाही समावेश असणार आहे. त्यामुळे समजा भारताच्या मुख्य संघातील एखादा खेळाडू जायबंदी झाला किंवा त्याने काही कारणास्तव मधूनच माघार घेतली तर त्याच्या जागी बदली खेळाडू लगेच उपलब्ध होईल.

भारतीय संघाची निवड करण्यासाठी सध्या निवड समिती कामाला लागली असून निवड समितीतील चार सदस्य सध्या दररोजच्या सामन्यांना हजेरी लावत आहेत किंवा टीव्हीवरून सामने पाहून खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. सध्या सर्व खेळाडू फ्रँचायझींच्या मार्गदर्शनाखाली खेळत असल्यामुळे, सध्या कोणत्याही खेळाडूला वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना करण्यात आल्या नाहीत.

“बीसीसीआयशी मध्यवर्ती करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंपैकी एखादा कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास, त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय आणि क्रीडा शास्त्रज्ञांच्या टीमच्या देखरेखीखाली पुढील वाटचाल करावी लागेल. समजा, मध्यवर्ती करारातील एखादा खेळाडू किंवा भारत अ, इमर्जिंग भारत संघातील एखाद्या खेळाडूला गरज भासल्यास तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची मदत घेऊ शकतो. मात्र सध्याचे खेळाडू हे फ्रँचायझीशी करारबद्ध असल्यामुळे, तुम्ही अमूक एक सामने खेळले पाहिजेत, असे बंधन बीसीसीआय घालू शकत नाही,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in