'प्रज्ञा'पराक्रम; टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची विश्वविजेत्या लिरेनवर सरशी आनंदला मागे टाकून भारतातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू ठरण्याचा मान

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा: भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद म्हणजेच आर. प्रज्ञानंदने बुधवारी महापराक्रम नोंदवला
'प्रज्ञा'पराक्रम; टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची विश्वविजेत्या लिरेनवर सरशी
आनंदला मागे टाकून भारतातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू ठरण्याचा मान
Published on

विक अन झी (नेदरलँड्स)

भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद म्हणजेच आर. प्रज्ञानंदने बुधवारी महापराक्रम नोंदवला. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत त्याने चीनचा विश्वविजेता डिंग लिरेनचा धुव्वा उडवला. तसेच त्याने अनुभवी विश्वनाथन आनंदला लाईव्ह रेटिंगमध्ये पिछाडीवर टाकून भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवला आहे.

नेदरलँड्समध्ये सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरू असून या स्पर्धेतील चौथ्या फेरीत किशोरवयीन प्रज्ञानंदने लिरेनला ६२ चालींमध्ये पराभूत केले. गतवर्षी सुद्धा प्रज्ञानंदने याच स्पर्धेत चौथ्या फेरीत लिरेनला नमवले होते. प्रज्ञानंद कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे तो जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत लिरेनला आ‌व्हान देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. प्रज्ञानंदने गतवर्षी नॉर्वेचा माजी जगज्जेता मॅग्लन कार्लसनलासुद्धा हरवले होते.

प्रज्ञानंदच्या खात्यात सध्या २७४८.३ फिडे लाईव्ह रेटिंग गुण असून तो क्रमवारीत ११व्या स्थानी आहे, तर पाच वेळचा जगज्जेता आनंद २७४८ गुणांसह १२व्या क्रमांकावर आहे. प्रज्ञानंदच्या पुढे सध्या कुणीही भारतीय बुद्धिबळपटू नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणाऱ्या अधिकृत क्रमवारीपर्यंत तो आपले स्थान टिकवतो का, हे पाहणे रंजक ठरेल. प्रज्ञानंदच्या नावावर या स्पर्धेतील चार फेऱ्यांनंतर २.५ गुण जमा आहेत. नेदरलँड्सचा अनिश गिरी ३.५ गुणांसह सध्या अग्रस्थानी आहे. भारताचे अन्य स्पर्धक विदीत गुजराथी व डी. गुकेश अनुक्रमे २ व १.५ गुणांसह प्रज्ञानंदच्या मागे आहेत. पाचव्या फेरीत प्रज्ञानंदची अनिशशी गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in