फिफा विश्वचषकात पात्र ठरण्याची भारतामध्ये क्षमता; बायचुंग भुतियाने यांचे मत

४५ वर्षीय भुतियाने गुरुवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदासाठी नव्याने दावेदारी केली.
फिफा विश्वचषकात पात्र ठरण्याची भारतामध्ये क्षमता; बायचुंग भुतियाने यांचे मत

भारतीय संघ गुणवत्तेच्या बळावर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो. परंतु यासाठी फुटबॉलची संरचना (ढाचा) बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने व्यक्त केले.

४५ वर्षीय भुतियाने गुरुवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदासाठी नव्याने दावेदारी केली. यावेळी त्याने भारतीय फुटबॉलच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. “भारताचे कनिष्ठ तसेच वरिष्ठ फुटबॉल संघ फिफा विश्वचषकासाठी नक्कीच पात्र ठरू शकतात. या संघांमध्ये गुणवान खेळाडूंचा समावेश आहे. परंतु त्यासाठी एआयएफएफची संरचना बदलण्याची गरज आहे,” असे भुतिया म्हणाला.

“पायाभूत सुविधांवर अधिक लक्षकेंद्रीत करून देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडूंचा शोध घेतला पाहिजे. त्याशिवाय जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील समित्या, संघटनांमध्ये पारदर्शक कारभार असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी जर एआयएफएफच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलो, तर भारतीय फुटबॉलमध्ये आमुलाग्र बदल करेन,” असेही १००हून अधिक लढतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भुतियाने सांगितले. फिफाने भारतीय फुटबॉलवर बंदी घातल्यामुळे सध्या देशातील फुटबॉलमध्ये क्रांती घडण्याचे संकेत मिळत आहेत. भारताने कुमारी विश्वचषकाचे यजमानपद गमावले. तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सहभागी होण्यास बंदी असल्याने भुतियाने भारतीय फुटबॉलला सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अध्यक्षपदासाठी भुतियाची नव्याने दावेदारी

भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने गुरुवारी एआयएफएफच्या अध्यक्षपदासाठी नव्याने अर्ज भरला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भुतियाला काही राजकीय क्षेत्रातील नामांकिताशी झुंज द्यावी लागेल. त्याशिवाय ‘फिफा’च्या बंदीनंतर एआयएफएफचा कायापालट करण्याची जबाबदारी ४५ वर्षीय भुतियाला पेलावी लागेल. २ सप्टेंबर रोजी एआयएफएफची निवडणूक पार पडणार आहे. मोहन बागानचे माजी गोलरक्षक तसेच भाजप नेते कल्याण चौबे यांनीही या पदासाठी अर्ज भरला असून त्यांना भुतियाकडून कडवी टक्कर मिळेल, असे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in