भारताची भजन कौर ऑलिम्पिकला पात्र; सुवर्णपदकाला गवसणी; पुरुष व महिला संघाची मात्र निराशा

भारताचा पुरुष आणि महिला संघाचा ऑलिम्पिक प्रवेश आता आंतरराष्ट्रीय मानांकनावर अवलंबून राहणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रछाया सौजन्य -एक्स (@SportsArena1234)
Published on

नवी दिल्ली : भारताच्या भजन कौरने अखेरच्या ऑलिम्पिक तिरंदाजी पात्रता फेरीत सुवर्णपदक पटकावत वैयक्तिक प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. त्यापूर्वी अंकिता भकतनेही उपांत्यपूर्व फेरी गाठत आपला ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला.

भारताचा पुरुष आणि महिला संघाचा ऑलिम्पिक प्रवेश आता आंतरराष्ट्रीय मानांकनावर अवलंबून राहणार आहे. भारताची प्रमुख तिरंदाज दीपिका कुमारीला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही अंकिता आणि भजन यांनी आपल्या सरस कामगिरीच्या आधारे वैयक्तिक ऑलिम्पिक प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य केले.

अननुभवी भजनने सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करता इराणच्या अव्वल मानांकित मोबिना फल्लाचा एकतर्फी लढतीत पराभव करून सुवर्णपदक मिळवले. भजनने चमकदार कामगिरी करताना एकही सेट गमावला नाही. भजनने एकतर्फी झालेली सुवर्ण लढत ६-२ (२८-२६, २९-२९, २९-२६, २९-२९) अशी जिंकली.

ऑलिम्पिक रिकर्व्ह प्रकारात अव्वल आठ देशांना वैयक्तिक ऑलिम्पिक कोटाचा निर्णय या फेरीत निश्चित करण्यात आला. प्रत्येक देशाला एक वैयक्तिक कोटा देण्यात आला. भारताला आता पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागातून वैयक्तिक कोटा मिळाला आहे. पुरुष गटातून धीरज बोम्मादेवराने आशियाई पात्रता फेरीतून कोटा मिळवला होता.

अखेरच्या पात्रता फेरीत सर्वात आधी भारताच्या अंकिताने फिलिपाईन्सच्या गॅब्रिएली मोनिका बिदौरेचे आव्हान ६-० असे सहज परतवून लावत उपांत्यपूर्वी फेरी निश्चित केली. मात्र, उपांत्यपूर्वी फेरीत अंकिताला पराभवाचा सामना करावा लागला. दीपिका कुमारीने मात्र निराशा केली. अझरबैजानच्या यायलागुल रॅमाझानोवाविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून ४-० अशी मिळवलेली आघाडी दीपिकाला राखता आली नाही. नंतर सलग तीन सेटमध्ये यायलागुलने कमालीची अचूकता राखून ६-४ असा विजय नोंदवला.

logo
marathi.freepressjournal.in