भेदकतेपुढे भारताची भंबेरी! राहुलच्या झुंजार अर्धशतकामुळे ८ बाद २०८ धावांपर्यंत मजल

६ बाद १२१ धावांवरून राहुल व शार्दूल ठाकूर यांनी प्रतिकार केला. दोघांनी सातव्या विकेटसाठी ४३ धावांची उपयुक्त भागीदारी रचली.
भेदकतेपुढे भारताची भंबेरी! राहुलच्या झुंजार अर्धशतकामुळे ८ बाद २०८ धावांपर्यंत मजल
PM

सेंच्युरियन : ३१ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांची मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भंबेरी उडाली. अनुभवी वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने ४४ धावांत ५ बळी मिळवल्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताची ८ बाद २०८ अशी अवस्था आहे. के. एल. राहुलने (१०५ चेंडूंत नाबाद ७० धावा) एक बाजू सांभाळताना झुंजार अर्धशतक झळकावल्याने भारताने किमान २०० धावांचा पल्ला गाठला असून त्याच्यासह मोहम्मद सिराज शून्यावर खेळत आहे.

सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे पावसाने खोळंबा केला. दिवसभरात फक्त ५९ षटकांचाच खेळ शक्य झाला. पावसामुळे नाणेफेकही उशिराने झाली, तर सामनाही अर्धा तास विलंबाने सुरू झाला. भारताच्या डावातील ५९ षटके झाल्यावर पावसाचे पुन्हा आगमन झाले व त्यानंतर खेळ पूर्णपणे थांबला. त्यामुळे बुधवारी निर्धारीत वेळेपक्षा अर्धा तास अगोदर (भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता) खेळ सुरू करण्यात येणार आहे. राहुल व सिराज यांनी नवव्या विकेटसाठी १७ धावांची भर घातली असून बुधवारी राहुल तळाच्या फलंदाजांसह कितपत झुंज देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रवींद्र जडेजा पाठदुखीमुळे अनुपलब्ध असल्याने भारताने रविचंद्रन अश्विनला फिरकीपटू म्हणून खेळवले. तर प्रसिध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली. दरम्यान, रबाडाने बावुमाचा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय योग्य ठरवत भारताचा कर्णधार रोहित शर्माला पाचव्याच षटकात अवघ्या ५ धावांवर माघारी पाठवले. रबाडाला पूलचा फटका लगावण्याचा मोह रोहितला आवरता आला नाही. दुसऱ्या बाजूने पदार्पण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने यशस्वी जैस्वाल (१७) व शुभमन गिल (२) यांना जाळ्यात अडकवून भारताची ११.१ षटकांत ३ बाद २४ अशी अवस्था केली.

तेथून विराट कोहली व श्रेयस यांनी संघाला सावरले. दोघांनी उपहारापर्यंत पडझड होऊ न देता भारताला ९१ धावांपर्यंत नेले. मात्र उपहारानंतरच्या पहिल्याच षटकात रबाडाने श्रेयसचा ३१ धावांवर त्रिफळा उडवला. श्रेयस व विराटने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. ५ चौकारांसह ३८ धावा काढून विराट उत्तम लयीत दिसत असताना रबाडाच्याच एका अप्रतिम आऊटस्विंगरवर तो फसला. चार षटकांच्या अंतरातच रबाडाने रविचंद्रन अश्विनलाही (८) माघारी पाठवले.

६ बाद १२१ धावांवरून राहुल व शार्दूल ठाकूर यांनी प्रतिकार केला. दोघांनी सातव्या विकेटसाठी ४३ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. मात्र रबाडाने पुन्हा एकदा जोडी फोडताना शार्दूलला (२४) बाद केले. मार्को यान्सेनने जसप्रीत बुमराचा शून्यावरच त्रिफळा उडवला. राहुलने मात्र एक बाजू पकडून ठेवली. बर्गरला षटकार लगावून त्याने कारकीर्दीतील १४वे अर्धशतक साकारले. १० चौकार व २ षटकारांसह राहुल खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. आफ्रिकेकडून रबाडाने पाच, बर्गरने दोन, तर यान्सेनने एक बळी मिळवला आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ५९ षटकांत ८ बाद २०८ (के. एल. राहुल नाबाद ७०, विराट कोहली ३८; कॅगिसो रबाडा ५/४४)

 १४ रबाडाने कसोटी कारकीर्दीत १४व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. ६१ कसोटींमध्ये त्याच्या नावावर २८५ बळी जमा आहेत.

 १४ राहुलने कसोटी कारकीर्दीतील १४वे अर्धशतक साकारले. २०२१मध्ये आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथील कसोटीत राहुलने शतक झळकावले होते.

 मालिका जिंकण्यासाठी नशिबाची साथ आवश्यक -द्रविड

आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला नशिबाची साथ लाभणेही गरजेचे आहे, असे मत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. “गेल्या ३१ वर्षांत भारताला एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २-३ वेळा आम्ही मालिकेत आघाडी घेऊनही नंतर ती गमावली. कधी-कधी तुम्हाला ९० ते ९५ टक्के मेहनतीसह ५ टक्के नशिबाची साथही आवश्यकही असते. आव्हानात्मक परिस्थितीत नशिबाने साथ दिली, तर तुमच्या बॅटला कड लागून चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जात नाही,” असे द्रविडने स्मित हास्य करत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in