परिपूर्ण बुमरामुळे जगभरात भारताच्या गोलंदाजांची चर्चा! कपिल देव यांच्याकडून स्तुतिसुमने; विराटला सातत्य राखण्याचा सल्ला

जसप्रीत बुमराविषयी मला वेगळे काही म्हणण्याची गरज नाही. त्याच्यामुळे भारताच्या गोलंदाजांची जगभरात चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेटसाठी याहून सुखावणारा क्षण काय असू शकतो, अशा शब्दांत भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बुमरावर स्तुतिसुमने उधळली.
परिपूर्ण बुमरामुळे जगभरात भारताच्या गोलंदाजांची चर्चा! कपिल देव यांच्याकडून स्तुतिसुमने; विराटला सातत्य राखण्याचा सल्ला
Published on

जसप्रीत बुमराविषयी मला वेगळे काही म्हणण्याची गरज नाही. त्याच्यामुळे भारताच्या गोलंदाजांची जगभरात चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेटसाठी याहून सुखावणारा क्षण काय असू शकतो, अशा शब्दांत भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बुमरावर स्तुतिसुमने उधळली.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थ येथील पहिल्या कसोटीत कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. पहिल्या डावात १५० धावांत गारद झाल्यावर बुमराने ५ गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत रोखले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल, विराट कोहली यांच्या शतकांमुळे भारताने दुसऱ्या डावात ४८७ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ५३४ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र त्यांचा डाव २३८ धावांत आटोपला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे सुरू होईल. ही कसोटी गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार असल्याने त्यापूर्वी ३० नोव्हेंबरपासून एक सराव सामनाही भारतीय संघ खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे.

“बुमराचे विशेष कौतुक करणे गरजेचे आहे. मात्र त्याच्याविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. बुमराची कामगिरीच सर्व काही सांगते. त्याच्यासह मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी व आताचे हर्षित राणा, आकाश दीप असे एकाहून एक दर्जेदार वेगवान गोलंदाज भारताकडे आहेत. त्यामुळे आता भारताच्या वेगवान गोलंदाजांची जगभरात चर्चा सुरू आहे,” असे कपिल म्हणाले. चेंबूर गोल्फ क्लब येथे एका कार्यक्रमासाठी ६५ वर्षीय कपिल उपस्थित होते.

“न्यूझीलं संघाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच कसोटीत इतकी दमदार कामगिरी करेल, असे मला वाटले नव्हते. मात्र बुमराने गोलंदाजीसह नेतृत्वातही छाप पाडली. वेगवान गोलंदाजही कसोटीत कर्णधारपद भूषवू शकतात, हे त्याने दाखवून दिले. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यामुळेच बुमरा व अन्य गोलंदाजांविषयी जेव्हा चर्चा होते, तेव्हा फार आनंद होतो,” असेही कपिल यांनी नमूद केले.

जागतिक क्रमवारीत बुमरा पुन्हा अग्रस्थानी

भारताच्या ३० वर्षीय जसप्रीत बुमराने बुधवारी आयसीसीच्या जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली. तसेच बुमराने कारकीर्दीत प्रथमच सर्वाधिक ८८३ गुण कमावले. मालिकेपूर्वी बुमरा तिसऱ्या स्थानी होता. मात्र आता कगिसो रबाडाची ८७२ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे जोश हेझलवूड व रविचंद्रन अश्विन यांचा क्रमांक लागतो. बुमराने यापूर्वीही कसोटीसह टी-२० व एकदिवसीय प्रकारातही गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावण्याचा पराक्रम केला होता.

logo
marathi.freepressjournal.in