कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची संयुक्त आघाडी कायम! नेपोम्नियाशीविरुद्धची लढत बरोबरीत; विदितने प्रज्ञानंदला रोखले

 कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची संयुक्त आघाडी कायम! नेपोम्नियाशीविरुद्धची लढत बरोबरीत; विदितने प्रज्ञानंदला रोखले

टोरंटो : भारताच्या डी. गुकेशने रशियाच्या इयान नेपोम्नियाशीविरुद्ध बरोबरीची नोंद करताना कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीअंती संयुक्त आघाडी कायम राखली. १०व्या फेरीत दोन भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या लढतीत नाशिककर विदित गुजराथीने काळया मोहऱ्यांनी खेळताना आर. प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले. खुल्या विभागातील अन्य दोन लढतींत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा विजयी ठरले.

आता अखेरच्या चार फेऱ्या शिल्लक असताना या स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली आहे. संयुक्त आघाडीवर असणाऱ्या गुकेश आणि नेपोम्नियाशी यांचे समान सहा गुण आहेत. प्रज्ञानंद, कारुआना आणि नाकामुरा त्यांच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहेत. विदित पाच गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा ३.५ गुणांसह सातव्या, तर अझरबैजानचा निजात अबासोव तीन गुणांसह आठव्या स्थानी आहे. ११व्या फेरीपूर्वी विश्रांतीचा दिवस आहे.

दहाव्या फेरीत नाकामुराने अबासोवला, तर कारुआनाने फिरुझाला पराभूत केले. या फेरीतील सर्वांचे लक्ष लागलेली गुकेश आणि नेपोम्नियाशी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. नेपोम्नियाशी यंदाच्या स्पर्धेत अपराजित असला, तरी त्याचा खेळ गुकेशइतका बहरलेला नाही. गुकेशविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळतानाही त्याने धोका पत्करणे टाळले. रुइ लोपेझ पद्धतीने सुरुवात केल्यानंतर नेपोम्नियाशी पटावर भक्कम स्थितीत होता. मात्र, गुकेशने चांगल्या चाली रचत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या टप्प्यात दोन्ही खेळाडूंनी हत्तींची आणि काही प्याद्यांची अदलाबदल केली. मात्र, दोघांनाही विजयाची संधी दिसत नसल्याने ४० चालींअंती त्यांनी बरोबरी मान्य केली.

प्रज्ञानंदने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दुसऱ्या फेरीतील गुकेशविरुद्धचा पराभव वगळता तो कोणत्याही लढतीत फारसा अडचणीत सापडलेला नाही. दहाव्या फेरीत १८ वर्षीय प्रज्ञानंदला विदितने वापरलेल्या बर्लिन बचावाचा सामना करावा लागला. तीन प्यादी आणि वजीर टिपल्यानंतर अखेरच्या टप्प्यात दोन्ही भारतीयांना जिंकण्याची फारशी संधी नव्हती. त्यामुळे ३९ चालींअंती त्यांनी बरोबरीवर समाधान मानण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in