आशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

जागतिक क्रमवारीत १६ स्थानापर्यंत असलेल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता येईल. सिंधू सध्या क्रमवारीत १२व्या स्थानी असली तरी २०२३पासून तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे सिंधूवरील दडपण वाढत आहे.
आशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात
Published on

निंग्बो (चीन) : भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या दोन अनुभवी खेळाडूंना गुरुवारी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे भारताचेसुद्धा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक क्रमवारीत १६ स्थानापर्यंत असलेल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता येईल. सिंधू सध्या क्रमवारीत १२व्या स्थानी असली तरी २०२३पासून तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे सिंधूवरील दडपण वाढत आहे. महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत चीनच्या सहाव्या मानांकित हॅन यू हिने सिंधूला २१-१८, १३-२१, २१-१७ असे तीन गेममध्ये पराभूत केले. १ तास व ९ मिनिटांच्या संघर्षानंतर सिंधूने हार पत्करली. त्याशिवाय महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांनाही उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

पुरुष एकेरीत तैवानच्या लीन चीन यूने आठव्या स्थानी असलेल्या भारताच्या प्रणॉयला २१-१८, २१-११ अशी धूळ चारली. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत पहिल्याच फेरीत बुधवारी पराभूत झाले. त्याशिवाय सात्विक-चिराग या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे एकेरी व दुहेरी अशा सर्व गटांतून भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in