भारताचा स्वप्नभंग

श्रीलंकेत झालेल्या या विश्वचषकात भारताने गटसाखळीत सलग चार सामने जिंकून अग्रस्थानासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली
भारताचा स्वप्नभंग

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र त्यानंतर जवळपास सात वर्षांनी भारताला दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी आली होती. दुर्दैवाने २०१४ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेकडून भारताला पराभव पत्करावा लागला आणि भारतासह तमाम चाहत्यांचा स्वप्नभंग झाला. आजच्या सदरात भारताच्या त्याच विश्वचषकातील कामगिरीचा घेतलेला आढावा.

१६ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान श्रीलंकेत झालेल्या या विश्वचषकात भारताने गटसाखळीत सलग चार सामने जिंकून अग्रस्थानासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली. त्यांनी सर्वप्रथम पाकिस्तानला सात गडी राखून धूळ चारली. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दोन लढतींमध्ये झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि बांगलादेशला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविचंद्रन अश्विनच्या फिरकीने कमाल केली. त्यामुळे भारताने सर्वाधिक नेट रनरेट राखून सहज उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

त्यानंतर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी भारताची गाठ पडणार होती. आफ्रिकेने १७३ धावांचे लक्ष्य भारतासमोर उभे केले. त्यांच्याकडे डेल स्टेन, इम्रान ताहिरसारखे दमदार गोलंदाज असल्याने भारताला लक्ष्य गाठणे कठीण जाईल, असे वाटले. परंतु कोहलीने त्यादिवशी झुंजार खेळी साकारून भारताला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. २०११ मध्ये भारताने श्रीलंकेला नमवूनच एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. मात्र यावेळी श्रीलंकेने त्या पराभवाचा वचपा काढला. अंतिम फेरीत त्यांनी भारताच्या बलाढ्य फलंदाजीला अवघ्या १३० धावांत रोखले. त्यानंतर कुमार संगकाराच्या अर्धशतकाच्या बळावर त्यांनी सहा गडी राखून भारतावर वर्चस्व गाजवले.

आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला फक्त चार दिवस शिल्लक असताना भारतीय संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. यामध्ये ते कितपत यशस्वी होणार, याचे उत्तर १३ नोव्हेंबरपर्यंत सर्वांना मिळेलच.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in